Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी: दिव्याखालीच अंधार! पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारीच मोबाईलवर मटका चार्ट पाहण्यात व्यस्त; व्हिडिओ व्हायरल

​   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जनसामान्यांच्या समस्या आणि सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या सरकारी बैठकीत, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी एक जबाबदार अधिकारी आपल्या मोबाईलवर मटका जुगाराचे चार्ट पाहण्यात मग्न असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा एक ३५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे शासकीय वर्तुळात आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यासपीठावर इतर वरिष्ठ अधिकारी गंभीर मुद्द्यांवर चर्चा करत असताना, हा अधिकारी मात्र कोणाचीही भीती न बाळगता आपल्या स्मार्टफोनवर ‘कल्याण मॉर्निंग’ आणि ‘मुंबई रॉयल नाईट’ सारख्या नामांकित मटका मार्केटचे रिझल्ट्स आणि चार्ट्स स्क्रोल करत आहे. शासकीय बैठकीचे गांभीर्य बाजूला ठेवून, कर्तव्यावर असताना जुगाराच्या आकड्यांमध्ये गुंग राहण्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय अनास्था आणि बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. मटका जुगार हा कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित असतानाही, एका बड्या शासकीय अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य केले जात असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लाजिरवाण्या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५३ पूरबाधित आणि ११० दरडप्रवण गावे; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

   Follow us on        

कणकवली:यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे, वीज पडणे आणि आग यांसारख्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत-परूळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह सर्व विभागांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग, तालुकास्तर आणि ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण ८९९ इतके मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षांचे सरासरी पर्जन्यमान ३,४६८.३८ मी.मी. असून दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा जिल्ह्यात एकूण ५३ पूरबाधित गावे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यामध्ये दोडामार्ग-११, वेंगुर्ले-६, सावंतवाडी-९, कुडाळ-५, मालवण-६, देवगड-४, कणकवली-६ आणि वैभववाडी-६ अशी गावे समाविष्ट आहेत. तसेच ११० गावे दरडप्रवण (दरड कोसळण्याची शक्यता असलेली) म्हणून घोषित करण्यात आली असून, यात दोडामार्ग १३, सावंतवाडी-१५, वेंगुर्ले-१२, मालवण-९, कणकवली-१३, देवगड-१७ आणि वैभववाडी-१२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना आधीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

​या आपत्ती व्यवस्थापनासाठी ८९९ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून, त्यात एनडीआरएफ पथक-२० (१ जुलै ते ३० सप्टेंबर), आपदा मित्र-२००, युवा आपदा मित्र-६६, गृहरक्षक-१३९, नागरी संरक्षण स्वयंसेवक-४३४ आणि विविध स्थानिक रेस्क्यू ग्रुप जसे की आंबोली व सांगेली रेस्क्यू ग्रुप-२०, सह्याद्री जीव रक्षक करूळ-२० आणि जय बालाजी रेस्क्यू ग्रुप मालवण-१० यांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने बचावासाठी १०१८ लाईफ जॅकेट्स, ६१३ लाईफ बोया, ३७ बोट, १३ रोबोटिक वॉटरक्राफ्ट, १२६ स्ट्रेचर, ८७ सेफ्टी रोप्स, १३ टेंट, १५ सॅटेलाईट फोन आणि ६८ वॉकी टॉकी अशी अत्याधुनिक उपकरणे देखील सज्ज ठेवली आहेत.

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

“जीव गेला तरी जमीन विकणार नाही” शिरशिंगेवासीयांनी जमीन मोजणी हाणून पाडली

   Follow us on        

​सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील, कोकणाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावात सामूहिक जमिनी हडप करण्याचा बाहेरच्या धनदांडग्यांचा कुटील डाव ग्रामस्थांनी एकजुटीने हाणून पाडला आहे. गावातील श्रीदेवी पाहुणाई रवळनाथ मंदिरामध्ये गावातील सर्व मानकरी, ग्रामस्थ आणि सरपंच एकत्र आले होते. या ठिकाणी महसूल आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने मंगेश तारकर आरोसकर यांच्या जागेसंदर्भात लावण्यात आलेली जमिनीची मोजणी सर्व गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत आणि प्रशासनाला जाब विचारत पूर्णपणे उधळून लावली. ‘जीव गेला तरी चालेल, पण आपली वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परप्रांतीय किंवा बाहेरच्या व्यक्तीला कवडीमोल भावाने विकणार नाही’, असा पक्का निर्धार या सभेमध्ये सर्व शिरशिंगेवासीयांनी एकमुखाने केला.

​गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरशिंगे गावातील ३२ एकर हे सामायिक (सामूहिक) क्षेत्र असून त्यावर संपूर्ण गावाचा समहक्क आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीला संमतीशिवाय किंवा धडेवाटप न करता जमिनीचा तुकडा देता येणार नाही. गावातील काही एजंट आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या या जमिनी काही हजारांत बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावात एकीचा नवा इतिहास रचत भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना जागेवरच मोजणी स्थगितीचा पंचनामा करण्यास भाग पाडण्यात आले.

​याप्रसंगी शिरशिंगे गावाचे सरपंच दीपक शांताराम राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या पूर्वजांनी जशी सामायिक जमीन एकत्र ठेवली, तशीच ती पुढेही कायम राखण्यासाठी संपूर्ण गावाने एकत्र येऊन या मोजणीला आणि जमीन विक्रीला पूर्ण विरोध केला आहे. जमीन राहिली तरच गाव आणि गावाचे अस्तित्व टिकून राहील, त्यामुळे गावकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच चुकीच्या पद्धतीने मोजणीचे घाट घालू नका, असा इशारा त्यांनी प्रशासनालाही दिला आहे. गावाच्या या एकजुटीमुळे धनदांडग्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून हा शिरशिंगेवासीयांच्या एकीचा मोठा विजय मानला जात आहे.

कोकणातील पारंपरिक आणि नैसर्गिक सजावटीला सोशल मीडियावर पसंती

   Follow us on        

सावंतवाडी: आजकालच्या आधुनिक आणि भपकेबाज सजावटीच्या काळात कोकणातील एका पारंपरिक, नैसर्गिक सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘कोकणचा भटक्या’ (kokancha_bhatkya) या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतले असून, त्याला तब्बल ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर आता हा आकडा १ मिलियनच्या पार जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

​या व्हिडिओमध्ये बांबू आणि विणलेल्या माडाच्या झावळ्यांचा वापर करून अत्यंत देखणी अशी नैसर्गिक सजावट केल्याचे दिसून येत आहे. या सजावटीमध्ये कोकणी संस्कृतीचे प्रतीक फणस देखील लटकवलेले पाहायला मिळत आहे. ही सुंदर  कलाकृती ‘कारीवडे भैरववाडी’ (Kariwade, Bhairavwadi) तील ग्रामस्थांच्या सहकार्यातून दिनांक १४ मे रोजी वाडीतील सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने ही सजावट साकारण्यात आली आहे. तुषार साईल, रोहन साईल आणि दीपक साईल यांच्यासह स्थानिक गावकऱ्यांनी मिळून ही आकर्षक सजावट केली आहे. “आजकालच्या मॉडर्न डेकोरेशनपेक्षा अशी नैसर्गिक सजावट कशी वाटते?” असा प्रश्न विचारत निसर्गरम्य कोकणची ही कलात्मक बाजू सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद

   Follow us on        

मालवण (प्रतिनिधी):पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद मालवणमधील यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून, आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश २६ मे २०२६ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. मालवणच्या पर्यटनात सागरी व खाडीतील जलपर्यटनाचे मोठे महत्त्व असून दरवर्षी १ सप्टेंबर ते २५ मे असा हा जलपर्यटनाचा अधिकृत हंगाम असतो. सध्या मे महिन्यात या हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी अधिकृत पत्र काढून ही बंदी जाहीर केली आहे.

​प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार (बोटिंग) आणि स्कुबा डायव्हिंग या सेवा पूर्णपणे बंद राहतील.

​हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा धोकादायक परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही आवश्यक खबरदारी घेतली जाते.

​दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सदरम्यान दुर्घटना; अंबरनाथमधील महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

​मालवण: मालवण येथील प्रसिद्ध दांडी समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बनाना राईड (Banana Ride) करत असताना समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे मुंबईजवळील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग येथील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

​दांडी समुद्रात बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली. त्या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्थानिक यंत्रणा आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार (First Aid) केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी शीतल यांची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूस आंब्याची भव्य आरास

   Follow us on        

​सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे यंदा देवगड हापूस आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली. या उपक्रमामुळे मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि पर्यटन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, या वर्षी या उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने ‘आंबा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते.

​या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटकांना अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देणे आणि हापूसच्या नावाने होणारी फसवणूक थांबवणे हा आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे शेतकऱ्यांसाठी १० स्टॉल्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. २०१७ मध्ये शैलेश बोंडाळे यांनी मांडलेल्या या संकल्पनेला आता मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.

धक्कादायक! मुंबई-गोवा महामार्गावर कासरडे येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

   Follow us on        

कणकवली:मुंबई-गोवा महामार्गावरील कासरडे ठिठा येथे शनिवारी (९ मे २०२६) उड्डाणपुलाच्या मधल्या भागातील काँक्रीट स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळ्या (रॉड) उघड्या पडल्या असून, पुलाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली असून, प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वीही याच पुलाचा स्लॅब दोनदा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार प्रमोद जठार यांनी तत्काळ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

​मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच अशा प्रकारे उड्डाणपूल कमकुवत ठरत असल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या भागाची तातडीने दुरुस्ती करावी आणि वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.

कणकवलीत भीषण कार अपघात; एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर जखमी

   Follow us on        

कणकवली: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारचा आज, ९ मे रोजी सकाळी साडेऊ नऊ वाजता नांदगाव ओटव पुलावर (ब्रिजवर) भीषण अपघात झाला. ही कार वेगात असताना अचानक दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरात धडकली. या भीषण धडकेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

​या अपघातात कार चालकासह पुढच्या सीटवर बसलेली मुलगी देखील गंभीररीत्या जखमी झाली आहे. मुलगी कारमध्ये अडकून पडली होती, तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search