कणकवली:यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरड कोसळणे, वीज पडणे आणि आग यांसारख्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत-परूळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह सर्व विभागांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग, तालुकास्तर आणि ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण ८९९ इतके मनुष्यबळ तैनात ठेवण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ वर्षांचे सरासरी पर्जन्यमान ३,४६८.३८ मी.मी. असून दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा जिल्ह्यात एकूण ५३ पूरबाधित गावे निश्चित करण्यात आली आहेत, ज्यामध्ये दोडामार्ग-११, वेंगुर्ले-६, सावंतवाडी-९, कुडाळ-५, मालवण-६, देवगड-४, कणकवली-६ आणि वैभववाडी-६ अशी गावे समाविष्ट आहेत. तसेच ११० गावे दरडप्रवण (दरड कोसळण्याची शक्यता असलेली) म्हणून घोषित करण्यात आली असून, यात दोडामार्ग १३, सावंतवाडी-१५, वेंगुर्ले-१२, मालवण-९, कणकवली-१३, देवगड-१७ आणि वैभववाडी-१२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना आधीच सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या आपत्ती व्यवस्थापनासाठी ८९९ प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून, त्यात एनडीआरएफ पथक-२० (१ जुलै ते ३० सप्टेंबर), आपदा मित्र-२००, युवा आपदा मित्र-६६, गृहरक्षक-१३९, नागरी संरक्षण स्वयंसेवक-४३४ आणि विविध स्थानिक रेस्क्यू ग्रुप जसे की आंबोली व सांगेली रेस्क्यू ग्रुप-२०, सह्याद्री जीव रक्षक करूळ-२० आणि जय बालाजी रेस्क्यू ग्रुप मालवण-१० यांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने बचावासाठी १०१८ लाईफ जॅकेट्स, ६१३ लाईफ बोया, ३७ बोट, १३ रोबोटिक वॉटरक्राफ्ट, १२६ स्ट्रेचर, ८७ सेफ्टी रोप्स, १३ टेंट, १५ सॅटेलाईट फोन आणि ६८ वॉकी टॉकी अशी अत्याधुनिक उपकरणे देखील सज्ज ठेवली आहेत.


