Mumbai Goa Highway: आता ‘गुगल मॅप’ सांगणार मुंबई-गोवा महामार्गावरील धोक्याची ठिकाणे!

   Follow us on        

रत्नागिरी:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘ऑपरेशन टॅप फॉर सेफ’ (Welcome to Ratnagiri) या विशेष मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी थेट गुगल कंपनीशी समन्वय साधून एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना गुगल मॅपवर धोक्याच्या ठिकाणांचे ‘रिअल-टाईम ऍलर्ट’ मिळणार आहेत.

अशा प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी केला आहे.

 

असे काम करणार हे तंत्रज्ञान:

या नव्या उपक्रमांतर्गत, वाहनचालक जसेही मुंबई-गोवा महामार्गावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करतील, तसा त्यांच्या गुगल मॅपवर ‘Welcome to Ratnagiri’ असा संदेश (Notification) दिसेल. त्यानंतर पुढील प्रवासादरम्यान रस्त्यात येणारे धोकादायक घाट, तीव्र वळणे, शाळा, मानवी वस्ती, अंडरपास तसेच अपघातप्रवण क्षेत्रांची (Black Spots) माहिती आगाऊ ऍलर्टद्वारे चालकाला दिली जाईल. यामुळे वाहनचालकांना वेळेतच वाहनाचा वेग नियंत्रित करणे आणि संभाव्य धोका ओळखून सावधपणे वाहन चालवणे सोपे होणार आहे.

१० महत्त्वाचे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित:

महामार्गावरील ज्या भागात आजवर वारंवार अपघात घडले आहेत, अशा साधारण एक ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील १० महत्त्वाचे अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) पोलिसांनी निश्चित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भोस्ते घाट, हातखंबा, निवळी आणि लांजा आदी भागांचा समावेश असून, या परिसराची अचूक माहिती गुगल मॅपवर अपडेट करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आधुनिक पाऊलामुळे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search