मुंबई:
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ५४ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या नागपूर, नवी अमरावती, खामगाव, लातूर, भुसावळ, पुणे आणि कोल्हापूर येथून पंढरपूर व मिरजसाठी धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना थेट पंढरपूर गाठणे अत्यंत सोयीचे होणार असून त्यांचा प्रवास अधिक सुकर होईल.
या ५४ गाड्यांपैकी २० आरक्षित विशेष गाड्या असतील. यामध्ये नागपूर-मिरज दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या चालवल्या जातील. ट्रेन क्रमांक ०१२०५ ही गाडी २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल, तर ट्रेन क्रमांक ०१२०६ ही गाडी २४ व २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय नवी अमरावती-पंढरपूरसाठी ४, खामगाव-पंढरपूरसाठी ४ आणि लातूर-पंढरपूर दरम्यान ८ फेऱ्यांच्या आरक्षित गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
सामान्य आणि अनारक्षित प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने ३४ अनारक्षित विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये भुसावळ-पंढरपूर दरम्यान ४, कोल्हापूर-कुर्डूवाडी दरम्यान १६ आणि पुणे-मिरज दरम्यान १४ फेऱ्या चालवल्या जातील. या आरक्षित विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग बुधवार, १ जुलै २०२६ पासून रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तसेच, अनारक्षित गाड्यांची तिकिटे ‘यूटीएस’ (UTS) प्रणालीद्वारे मिळतील. आषाढी यात्रेदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार आणखी गाड्या वाढवल्या जातील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.


