मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विस्तार करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या अखत्यारीत विविध मार्गांवर धावणाऱ्या ६ ‘विशेष’ (Special) रेल्वे गाड्यांना आता ‘नियमित’ (Regular) गाड्यांचा दर्जा देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, या निर्णयाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्रीपासून सुरू झाली असून, १५ ऑगस्ट २०२६ पासून या गाड्या नवीन नियमित क्रमांकाने धावण्यास सुरुवात झाली आहे.
या निर्णयांतर्गत नियमित करण्यात आलेल्या गाड्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे: हडपसर ते हजरत निजामुद्दीन (११४२९/११४३०) ही गाडी १५ ऑगस्टपासून दररोज धावेल. दादर ते भुसावळ (११०४३/११०४४) ही गाडी १७ ऑगस्टपासून आठवड्यातून तीनदा, तर दादर ते गोरखपूर (११०४७/११०४८) ही गाडी १८ ऑगस्टपासून आठवड्यातून चारदा धावणार आहे. तसेच, सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (११३०४/११३०३) ही साप्ताहिक गाडी १८ ऑगस्टपासून, पुणे ते कोल्हापूर (११४१९/११४२०) ही दररोज धावणारी गाडी २० ऑक्टोबरपासून आणि सोलापूर ते अकोला (११३१३/११३१४) ही साप्ताहिक गाडी २१ ऑगस्टपासून नवीन नियमित क्रमांकाने आपल्या सेवा सुरू करतील.
रेल्वे प्रशासनाने या बदलांची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिल्या आहेत. रेल्वे स्थानके आणि आरक्षण केंद्रांवर ध्वनिक्षेपकाद्वारे (Public Address System) तसेच नोटीस बोर्डावर या बदलांची माहिती प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सर्व मीडिया माध्यमांतून ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना अशी की, या बदलांमुळे रेल्वे गाड्यांचे क्रमांक बदलले असल्याने, प्रवास करताना प्रवाशांनी नवीन गाडी क्रमांकाची आणि वेळापत्रकाची पूर्वखात्री करून घ्यावी. विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यामुळे आता प्रवाशांना अधिक खात्रीशीर आणि नियोजनबद्ध रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुसह्य होईल.


