सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका उद्या, १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कार्यान्वित होणार आहे, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट मिळणार की नाही, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता दिलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जाहीर केले होते की, स्थानिक वाहनधारकांसाठी टोलमध्ये सवलत दिली जाईल आणि त्यांच्यासाठी वेगळी लेन उपलब्ध करून दिली जाईल. परंतु, प्रशासनाकडून या आश्वासनाबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही किंवा स्पष्ट आदेश न मिळाल्याने, प्रत्यक्ष टोल वसुली सुरू झाल्यावर स्थानिकांना टोल भरावा लागणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या ६० किलोमीटरच्या पट्ट्यासाठी हा टोल आकारला जाणार असून, याचे कंत्राट ‘स्कायलाईट इन्फ्रा इंजिनिअर्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. या टोल नाक्याच्या विरोधात टोलविरोधी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, पूर्ण टोल माफीची मागणी लावून धरली आहे. याआधीही तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र स्थानिकांच्या विरोधाचा फटका बसला होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, १७ जूनपासून या टोल नाक्यावर वसुली सुरू करण्यात येणार होती, ज्यामध्ये सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत देण्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, खासगी अव्यावसायिक वाहनांसाठी ३३० रुपयांचा मासिक पास उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे प्राधिकरणाने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.


