वेंगुर्ले तालुक्यातील आडारी-टेंबवाडी परिसरामध्ये घडलेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यात तब्बल ३१.५ तोळे सोन्याचे दागिने चोरलेले दोघेजण विद्यार्थी निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा वेंगुर्ले पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिषेच्या कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वेंगुर्ले पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला त्याच्या राहत्या परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या बालकाची कसून चौकशी केली असता, त्याने हा सर्व घरफोडीचा कट उमांदंडा आडारी, ता. वेंगुर्ले येथील १८ वर्षीय उमेश प्रल्हाद पेडणेकर याच्यासोबत मिळून केल्याची कबुली दिली. या महत्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तसेच इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने पार पाडली असून, पोलिसांच्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


