आंबोली: आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आलेले ५० वर्षीय संजय लक्ष्मण गांवकर यांचा चिरेखाणीतील साचलेल्या खोल पाण्यात बुडून सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. कालच ईथे सर्पदंशाने एका पर्यटकाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच, आंबोलीत पुन्हा एकदा अशीच दुसरी दुर्देवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत संजय गांवकर हे মাজगाव उद्यमनगर येथील ‘हिंदुस्थान पॉलिमर्स’ या कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्यासह कंपनीतील एकूण ११ कर्मचारी वर्ग मजगाव आणि इन्सुली परिसरातून फिरण्यासाठी आंबोली येथे दाखल झाला होता.
दुपारी सतिचीवाडी परिसरातील एका चिरेखाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर अचानक संजय गांवकर यांचा अंदाज चुकला व ते खोल पाण्यात गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्यांना यश येऊ शकले नाही.
या दुर्घटनेची त्वरित माहिती मिळताच माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्र आणि रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सह्याद्री एडव्हेंचर आंबोली तसेच सांगेलीच्या रेस्क्यू पथकातील सदस्य तात्काळ घटनास्थळी धडकले.
या बचाव मोहिमेदरम्यान रेस्क्यू टीममधील अजित नार्वेकर यांनी प्रसंगावधान राखत खोल पाण्यात उतरून संजय गांवकर यांचा मृतदेह बाहेर काढला. याकार्यात राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी मोलाची साथ दिली असून, आंबोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.


