वैभववाडी: महागड्या भेटवस्तूंचे प्रलोभन दाखवून ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या नागरिकांना गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. लकी ड्रॉच्या नावाखाली हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील तिघांना खांबाळे (ता. वैभववाडी) येथील जागरूक ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नुकत्याच कोकिसरे आणि एडगाव परिसरात घडलेल्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे स्थानिक ग्रामस्थ सतर्क होते, त्याचाच फायदा या भामट्यांच्या ‘खेळाचा’ पर्दाफाश करण्यासाठी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ तारखेला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन महिला आणि एक पुरुष चारचाकी वाहनातून खांबाळे गावात आले. त्यांनी ग्रामस्थांना लकी ड्रॉचे कुपन दाखवून त्यात गॅस शेगडी, टीव्ही, फ्रीज यांसारख्या मौल्यवान वस्तू बक्षीस म्हणून मिळतील, असे आमिष दाखवले. या टोळीने घरोघरी जाऊन नागरिकांना या कथित योजनेची माहिती दिली होती.
याआधी कोकिसरे आणि एडगाव भागात अशाच प्रकारे नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची बातमी ग्रामस्थांच्या कानावर आली होती. त्यामुळे खांबाळे येथील तरुण या तिघांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर ग्रामस्थांनी त्यांना अडवून विचारपूस केली असता, त्यांच्याकडे गावात वस्तू विक्रीची कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा पळ काढण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
लकी ड्रॉच्या या ‘खेळा’मागील कार्यपद्धती मोठी गुंतागुंतीची आहे. सुरुवातीला नागरिकांना आकर्षक वस्तूंचे स्वप्न दाखवून कमी किमतीचे कुपन घ्यायला प्रवृत्त केले जाते आणि एक छोटी वस्तू बक्षीस म्हणून दिली जाते, ज्यामुळे लोकांचा विश्वास बसतो. त्यानंतर, टीव्ही किंवा फ्रीजसारख्या महागड्या वस्तू अत्यंत कमी किमतीत मिळतील असे सांगून, कुपनमध्ये मोठे बक्षीस लागल्याचे भासवले जाते. बक्षीस मिळवण्यासाठी नागरिकांकडून हजारो रुपये उकळले जातात आणि त्यानंतर हे भामटे आपला फोन बंद करून किंवा गाव सोडून पसार होतात.
या कारवाईनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, संबंधित संशयित हे कोल्हापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने एका नागरिकाकडून टीव्ही देण्याचे सांगून सुमारे ३० हजार रुपये उकळले होते. दरम्यान, कोकिसरे येथील फसवणुकीप्रकरणी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी सर्वांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींच्या महागड्या वस्तूंच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


