गणेशोत्सव काळात एलटीटी-चिपळूण अतिरिक्त गाडी चालवणे शक्य – कोकण विकास समिती

   Follow us on        

मुंबई:

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वतीने अनेक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते रत्नागिरी दरम्यान चालवली जाणारी गणपती विशेष गाडी (०११६७/०११६८) आठवड्यातून पाच दिवस धावते आणि दर सोमवार व शुक्रवारी ती बंद असते. या दोन दिवशी रिकाम्या राहणाऱ्या गाडीच्या डब्यांचा (रॅक) कार्यक्षम वापर करत, याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस ते चिपळूण दरम्यान विशेष गाडी चालवावी, अशी महत्त्वाची मागणी ‘कोकण विकास समिती’च्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

​कोकण विकास समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, LTT-रत्नागिरी विशेष गाडी सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी इतर पुणे-रत्नागिरी सेवांच्या ऑपरेशनमुळे चालवली जात नाही. मात्र, या दोन दिवशी रॅक निरुपयोगी न ठेवता त्याचा उत्पादक आणि पर्यायी वापर म्हणून एलटीटी ते चिपळूण दरम्यान विशेष गाडी सुरू केल्यास मध्य कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

​चिपळूण, खेड, महाडसह परिसरातील प्रवाशांना होणार फायदा

​सध्याच्या काळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांत फुुल होते. अशा वेळी एलटीटी ते चिपळूण दरम्यान ही अतिरिक्त सेवा सुरू झाल्यास केवळ चिपळूणच नव्हे, तर खेड, महाड, माणगाव आणि लगतच्या परिसरातील प्रवाशांची सोय होईल. तसेच उपलब्ध रेल्वे संसाधनांचा आणि रॅकचा अत्यंत उत्तम प्रकारे सदुपयोग होईल, असे समितीचे म्हणणे आहे.

​वेळापत्रक कसे असेल?

​प्रस्तावित LTT-चिपळूण विशेष गाडीचे वेळापत्रक अशा प्रकारे आखावे, जेणेकरून ही रॅक दुसऱ्या दिवशीच्या ठरवलेल्या ०११७१ LTT-सावंतवाडी सेवेसाठी वेळेत उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या देखभालीच्या (maintenance) गरजा आणि मार्गावरील उपलब्धतेचा (path availability) अभ्यास करून यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

​या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव कोकण विकास समितीच्या शहरी व ग्रामीण विभागाचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठवला असून, गणेशोत्सवाच्या ऐन गर्दीच्या काळात या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search