सिंधुदुर्ग:
कोकणातील तरुणांचे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील स्थलांतर थांबवून त्यांना स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या उद्देशाने ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची संकल्पना मांडण्यात आली होती. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना याबद्दलचा आपला दृढ विश्वास व्यक्त केला होता.
या संकल्पनेला आता प्रत्यक्ष वास्तवात उतरवले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक आणि सागरी विकासाला मोठी दिशा देणारा हा भव्य जहाज बांधणी प्रकल्प साकारत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी होणार असून याद्वारे कोकणाच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.
झोया मरीम सर्व्हिसेस प्रायलवेट लिमिटेडच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०३ वाजता तळवणे (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे रोवली जाणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री नितेश राणे भूषवणार असून, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेбуडकर आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिहर उपस्थित राहणार आहेत. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाच्या सौंदर्याने समृद्ध असला तरी येथे मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची निकड भासत होती. या जहाज बांधणी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित आणि कुशल युवकांना त्यांच्या घराच्या जवळच रोजगाराच्या शाश्वत संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


