नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये नुकताच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखाणी यांचा विवाह रिसोप्शन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उच्च-स्तरीय सोहळ्यामध्ये देश-विदेशातील आणि विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मोठे राजकीय नेते उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
या भव्य कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूंचे नेते एकाच छताखाली एकत्र आल्याचे दिसून आले. यामध्ये विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका वाड्रा यांसारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
याच शानदार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये कोकणातील एक तरुण थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. ‘फणसाचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हिडिओमध्ये झळकणारा हा तरुण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झोपडे गावचा रहिवासी असून त्याचे नाव मिथिलेश देसाई आहे. त्यांना ‘फणस किंग’ म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये खास फणसाची एक वेगळी बाग तयार केली आहे.
मिथिलेश देसाई यांनी आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, त्यांनी राहूरी कृषी विद्यापीठातून BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या विषयात पदवी प्राप्त केली आहे. दिल्लीच्या या खास सोहळ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपल्या फणसाच्या कार्याविषयी आणि प्रकल्पाविषयी थेट पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली.


