पालघर: जिल्ह्यातील निसर्गरम्य दाभोसा धबधबा परिसरात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचे लोकार्पण करण्यात आले. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या नवीन पर्यटन प्रकल्पामुळे दाभोसा येथील पर्यटनाला अधिक वेग येईल आणि देशासह परदेशातील पर्यटकांचा ओघ या भागाकडे वळेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या विकासकामामुळे स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक आणि नैसर्गिक समृद्धीचा उल्लेख करत पालकमंत्री गणेश नाईक यांनी भविष्यात हा जिल्हा देशाच्या पर्यटन आणि आर्थिक नकाशावर महत्त्वाचे स्थान प्राप्त करेल, असा विश्वास दाखवला. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांशी जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वेगाने वाढत आहे. तसेच विमानतळ, बुलेट ट्रेन आणि विविध महामार्गांच्या प्रकल्पामुळे येथील विकासाला मोठी गती मिळणार असून, निसर्गसमृद्ध किनारपट्टी आणि डोंगराळ भागाचा शाश्वत विकास केला जाईल.
स्थानिक आदिवासी कुटुंबांना पर्यटनाचा थेट आर्थिक लाभ व्हावा, यासाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभासोबतच अतिरिक्त निवास सुविधा उभारण्यासाठी आर्थिक मदत किंवा कर्जाची व्यवस्था करण्यावर विचार व्हावा, जेणेकरून स्थानिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. तसेच स्कायवॉक परिसरामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता सीसीटीव्ही यंत्रणा थेट स्थानिक पोलीस ठाण्याशी जोडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दाभोसा येथील या स्कायवॉकसोबतच जव्हार तालुक्यातील इतरही पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एक सर्वसमावेशक एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. स्कायवॉक परिसरात पार्किंग, पर्यटक सुविधा आणि इतर सोयी-सुविधांचा विस्तार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलातील काही हिस्सा ग्रामपंचायतीला आणि पार्किंग व्यवस्थेचा लाभ स्थानिक संस्थांना मिळवून देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
या संपूर्ण पर्यटन विकासात महिला बचत गटांना सक्रियपणे जोडून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यादरम्यान खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होता.


