सिधुदुर्ग जिल्ह्याला परप्रांतीय भूमाफियांचा विळखा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर परप्रांतीय भूमाफियांची नजर पडली असून, संपूर्ण जिल्हा त्यांच्या विळख्यात सापडला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. स्थानिकांच्या जमिनी बळकावण्यापासून ते हजारो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यापर्यंतचे प्रकार सुरू असल्याचा दावा करत, त्यांनी यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

​पावसाळी अधिवेशनादरम्यान, जयंत पाटील यांनी दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी सभागृहात दिले होते, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र, शासनाकडून ठोस कारवाईचे आश्वासन मिळूनही, सध्या त्या जमिनीवरील सहा हजारांहून अधिक वृक्षांची विनापरवाना कत्तल सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

​दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे डोंगरांचे सपाटीकरण केले जात असून, सर्वेश पेडणेकर या तरुणाने अत्यंत निडरपणे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला असल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तत्कालीन तहसीलदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, तसेच सहहिस्सेदारांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, परप्रांतीयांना अकृषक (NA) आणि विकासाची परवानगी दिली होती, हा गंभीर प्रकार आता उघडकीस आला आहे.

​केवळ सासोलीच नव्हे, तर दोडामार्ग तालुक्यातील धारपी-उडेली गावामध्येही अशाच प्रकारे जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. येथील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बांध घालून अडवले जात असून, बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची विक्री केली जात असल्याचे त्यांनी पत्रात निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व अनधिकृत प्रकारांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

​भूमाफियांची हिंमत इतकी वाढली आहे की त्यांना आता शासनाचीही भीती राहिलेली नाही, असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी आणि येथील अमूल्य नैसर्गिक जैवसंपदा या भूमाफियांच्या तावडीतून तातडीने वाचवावी, तसेच स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search