​कोकणातील हजारो वर्षांचा ऐतिहासिक ठेवा आता शालेय अभ्यासक्रमात

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी :

हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा जिवंत साक्षीदार असलेला कोकणातील कातळशिल्परूपी अमूल्य ऐतिहासिक वारसा आता शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मुख्य भाग होणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे तसेच मंडळातील इतिहास समितीचे सदस्य, समीक्षक, लेखक आणि संयोजकांच्या विशेष प्रयत्नांमुळे या विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल इतिहासप्रेमी आणि संशोधकांकडून मंडळाचे तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

​कातळशिल्प हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ या प्राचीन शिल्पांची माहितीच मिळणार नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आदिम मानवाची जीवनशैली, त्यांचे विचारविश्व आणि त्यांची कलात्मक अभिव्यक्ती यांची सखोल ओळख होणार आहे. आपल्या स्वतःच्या परिसरातच जागतिक दर्जाचा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे, याची जाणीव यामुळे नवीन पिढीला होईल. इतिहास हा केवळ पुस्तकातील निर्जीव विषय नसून आपल्या आजूबाजूच्या भूमीत तो जिवंत स्वरूपात उभा आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या जाणीवेतून विद्यार्थ्यांच्या मनात ऐतिहासिक वारशाविषयी अभिमान, जतनाची जबाबदारी आणि संशोधक वृत्ती या मूल्यांची बीजे रोवली जातील.

​कोकणातील कातळशिल्पांचा पाठ्यपुस्तकात समावेश होणे हा केवळ अभ्यासक्रमातील एक भाग नसून, तो महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोकणातील कातळशिल्पांचा शोध घेणे, त्यांचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे, स्थानिक लोकांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि शासनापर्यंत हा विषय पोहोचवणे यासाठी संशोधकांनी आपले तन, मन आणि धन अर्पण करून अविरतपणे कार्य केले आहे. दीर्घ आणि अत्यंत खडतर अशा या प्रवासानंतर आज जेव्हा या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात अधिकृतपणे समावेश होत आहे, तेव्हा या अथक प्रयत्नांना खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाल्याची भावना मनात दाटून येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.

​कातळावर कोरलेल्या त्या आदिम रेषांनी हजारो वर्षांचा प्रवास करून आज पाठ्यपुस्तकात स्थान मिळवले आहे. आता त्या केवळ पुस्तकाच्या पानांवर न राहता प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुतूहलात, विचारांत आणि संवेदनशील मनात कोरल्या जाव्यात; त्यातून भविष्यातील संशोधक, संवर्धक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारा सजग नागरिक घडावा, हीच या संपूर्ण प्रवासाची खरी कमाई आहे, असा विश्वास या मोहिमेत सातत्याने कार्यरत असणारे कोकणातील ज्येष्ठ संशोधक सुधीर (भाई) रिसबूड आणि धनंजय (दादा) मराठे यांनी व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search