महाबळेश्वर:
महाबळेश्वरमधील निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘विल्सन पॉइंट’ (सनराईज पॉइंट) परिसरासाठी सातारा वन विभागाने अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती (भेकवली) यांच्या वतीने संयुक्तपणे हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या नव्या नियमांनुसार, विल्सन पॉइंटचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता सभोवतालच्या मुख्य गाभा वनक्षेत्रात (Core Forest Area) पर्यटकांना प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय आणि वनसंपदेचे रक्षण म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार असून, ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच पर्यटकांना आपली वाहने आवाराबाहेर काढून घ्यावी लागणार आहेत.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत आणि संवेदनशील वनक्षेत्रात काही पर्यटकांकडून लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, रात्रीच्या पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
वन्यजीवांच्या सुरक्षेचा विचार करून पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात, ज्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आणि संपूर्ण वनक्षेत्रात प्लॅस्टिकचा कचरा न करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात विस्तीर्ण दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी पर्यटकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि दुर्मीळ पक्षी भयभीत होतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम डावलून ड्रोन उडवताना आढळल्यास तो थेट जप्त केला जाईल, असा इशारा वन प्रशासनाने दिला आहे.


