Follow us on
सांगली:
दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी समोर आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील फळे, भाजीपाला, फुले व इतर नाशवंत कृषी उत्पादनांना देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद व सुलभ वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिरज-दिल्ली किसान रेल सेवा’ सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने अखेर अंतिम मान्यता दिली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या थेट समन्वयातून या किसान रेल्वेचे पुढील नियोजन केले जाणार असून, बाजारपेठ ते शेतकरी असा थेट व्यवहार शक्य होणार आहे.
अशोक काकडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने किसान रेल सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रक्रियेत कृषी विभाग, रेल्वे प्रशासन, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याशी अनेक बैठका घेऊन योग्य समन्वय साधण्यात आला होता.
ही सेवा मिरज येथूनच सुरू व्हावी, अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली होती. यामागील मुख्य उद्देश केवळ रेल्वे सेवा सुरू करणे एवढाच नसून, मिरज-सांगली परिसरात नवीन ‘कृषी-लॉजिस्टिक आणि आर्थिक विकास केंद्र’ निर्माण करणे हा आहे. यामुळे भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे (Cold Storage), पॅक हाउसेस, वेअरहाउसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहेत. या किसान रेलमुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादने दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होईल. परिणामी, मालाची वाहतुकीतील नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.


