गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांना गाठवा लागणार गाव! कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: नुकतीच उन्हाळी सुट्टी संपवून मुंबईला परतलेल्या चाकरमान्यांपैकी ज्यांना आपले नाव गावाकडील मतदार यादीत कायम ठेवायचे आहे, त्यांना यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा गावाची वारी करावी लागण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ३० जूनपासून हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.

​तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २००२ नंतर पहिल्यांदाच मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि यादीतील मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी पूर्णपणे ‘क्लीन’ करणे हा आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.

​पुढील तीन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात व्यापक प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ९२१ ‘बीएलओ’ कार्यरत असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी ९३ सुपरवायझर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मॅपिंग करण्याचे काम सध्या जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९२.४२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

​३० जून ते २९ जुलै २०२६ या एक महिन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात सर्व बीएलओ निवडणूक आयोगाने दिलेले ‘प्रि-प्रिंटेड’ इन्फर्मेशन फॉर्म्स घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देतील. मुंबईकर चाकरमान्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी घरात हजर असेल, तरी ती संपूर्ण कुटुंबाची माहिती देऊन फॉर्म भरू शकते. मात्र, जर एखादे घर पूर्णपणे बंद असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती नोंदवूनच नाव समाविष्ट करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पावसाळ्याच्या दिवसांत येत असल्याने प्रशासनासमोर थोडे आव्हान नक्कीच आहे. परंतु, राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search