खेड:
कोकण रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटका शनिवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक १०१११ ‘कोकण कन्या एक्सप्रेस’ला बसला. खेड रेल्वे स्थानकावर पहाटे ३:०४ वाजता येणे अपेक्षित असलेली ही गाडी तब्बल आठ तास उशिराने, सकाळी ११:१० वाजता स्थानकात दाखल झाली. यामुळे प्रवाशांना स्थानकावर ताटकळत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.
रेल्वे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २६ जून) मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या ‘मांडवी एक्सप्रेस’मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्याचा परिणाम पुढील गाड्यांच्या वाहतुकीवर झाला. मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड एसी इकॉनॉमी (3E) डब्यातील वातानुकूलन यंत्रणा (AC) खेड स्थानकापासूनच बंद पडली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. एसी बंद झाल्यामुळे डब्यात घुसमट निर्माण होऊन लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी प्रवाशांचे मोठे हाल झाले.
दरम्यान, रत्नागिरी रेल्वे स्थानकात मांडवी एक्सप्रेसचे इंजिन बदलण्यात आले आणि सुमारे २५ मिनिटांच्या थांब्यानंतर वातानुकूलन यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मांडवी एक्सप्रेस उशिराने धावली आणि त्याचा साखळी परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील इतर गाड्यांवरही झाला. परिणामी, कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून कोकणात जाणाऱ्या तसेच मुंबईकडे प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.


