सावंतवाडी:
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.
या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


