सावंतवाडी टर्मिनस इमारत कामाची निविदा जारी; ईमेल मोहीम व कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजन सोहळ्याला तब्बल ११ वर्षे पूर्ण झाली, तरीही टर्मिनसची कामे रखडलेलीच होती. या अन्यायाविरुद्ध ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांच्या वतीने नुकतीच एक व्यापक ईमेल मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि निर्माण झालेल्या दबावामुळे अवघ्या ५ दिवसांत रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, सावंतवाडी टर्मिनस टप्पा-२ अंतर्गत रखडलेल्या मुख्य टर्मिनस इमारतीच्या कामाची अधिकृत निविदा (Tender) अखेर जारी करण्यात आली आहे.

१००० पेक्षा जास्त ईमेल आणि डिजिटल मीडियाचा खंबीर पाठिंबा

या मोहिमेदरम्यान कोकण रेल्वे महामंडळ, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाला रखडलेल्या कामांच्या तपशिलासह तब्बल १००० पेक्षा जास्त ईमेल पाठवण्यात आले होते. या जनआंदोलनाला ‘दैनिक पुढारी’सह विविध वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाने खंबीर साथ दिल्यामुळे शासन व प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेर ही निविदा काढण्यात आली. टर्मिनस प्रेमींनी हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा विजय असल्याचे म्हटले आहे.

कोकणातील आमदारांना साकडे

सध्या राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने, मुंबई आणि कोकणातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदारांना संघटनेने भावनिक साकडे घातले आहे. राज्य शासनाच्या अधीन असलेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरणातून पाणी पुरवठा योजना’ आणि ‘रत्नसिंधू समृद्धी योजनेतून’ होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामांना या अधिवेशनात तातडीने मंजुरी मिळवून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला असून दरवर्षी मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच ठोस पावले उचलावीत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि समस्त कोकणवासीयांनी केले आहे.

लढा अद्याप संपलेला नाही; प्रमुख मागण्या कायम

रेल्वेने केवळ इमारतीच्या कामाची निविदा काढली असली, तरी प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी पुढील मागण्यांवर कोकण रेल्वे महामंडळाने त्वरित विचार करून निधीची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे:

प्लॅटफॉर्मवर संपूर्ण शेड: पावसाळी व उन्हाळी संरक्षणासाठी प्लॅटफॉर्मवर ‘संपूर्ण शेड’ उभारणे.

नवा प्लॅटफॉर्म: गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘अजून एक नवीन प्लॅटफॉर्म’ तयार करणे.

अतिरिक्त रेल्वे रुळ: अतिरिक्त रेल्वे रुळांची (ट्रॅक) निर्मिती करणे.

या सर्व प्रमुख मागण्या आणि कामे मार्गी लावण्याचा लढा यापुढेही कायम राहील, असा निर्धार कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search