सिंधुदुर्ग नगरी:
शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना एकूण ५३ कोटी ८३ लाख २० हजार ४९१ रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या कर्जमाफी योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४,००८ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांची २० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे. तर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांमधील २,७०२ शेतकऱ्यांना एकूण ३३ कोटी १३ लाख ६३ हजार ४९१ रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय, जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र पात्र यादी तयार केली जाणार आहे.
दुसरीकडे, शासनाने निश्चित केलेल्या कालावधीपूर्वीची कर्जे असणे, तसेच काही कर्जदार विविध शासकीय किंवा इतर पदांवर कार्यरत असणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील थकीत कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासण्यात आली आहे. सर्व माहिती पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ‘आधार प्रमाणीकरणासाठी’ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांमार्फत आपले आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


