आमदार रवींद्र फाटक यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून दखल!
Follow us onदेवगड | प्रतिनिधी:
ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. या मागणीची तातडीने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदर बसफेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे नागरिक, तसेच कोकणात नियमितपणे ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. मात्र, या मार्गावर थेट एसटी बससेवेची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींना व त्रासाला सामोरे जावे लागते. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. ही सेवा सुरू झाल्यास नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे हेच आहे. त्यामुळे नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आमदार फाटक यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. या रास्त मागणीची दखल घेत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला ही बसफेरी त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.


