सावंतवाडी रेल्वे स्थानकात ‘गरीब रथ’सह इतर गाड्यांना थांबा द्या; खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) धावणाऱ्या ‘गरीब रथ एक्सप्रेस’सह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा, असे साकडे खासदार शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांना घातले आहे.

​कोकणातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी रोड स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा नसल्यामुळे सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना ऐनवेळी लांबच्या अन्य स्थानकांवर जाऊन रेल्वे पकडावी लागते. यामुळे कोकणवासीयांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत असल्यामुळे खासदार शिंदे यांनी सविस्तर पत्राद्वारे नागरिकांच्या या व्यथा रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

​खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रात सावंतवाडी रोड स्थानकाचे वाढते महत्त्व, कोकणातील वाढती प्रवासी संख्या आणि पर्यटनाला मिळणारी चालना याबाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आहेत. विशेषतः मुंबई आणि कोकणदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी गरीब रथ एक्सप्रेस व इतर प्रमुख गाड्यांचा थांबा उपलब्ध झाल्यास, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी पत्रात व्यक्त केला.

​या न्याय्य मागणीची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रोड स्थानकावर या रेल्वेगाड्यांचा थांबा देण्याच्या प्रस्तावाची व्यवहार्यता (Feasibility) तपासण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रस्तावाचा व्यवहार्यता अहवाल रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर, नियमानुसार त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.

​सावंतवाडी रोड स्थानकावर गरीब रथ एक्सप्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. तसेच, कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही यामुळे मोठी चालना मिळून सकारात्मक फायदा होईल.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search