कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’

   Follow us on        

रत्नागिरी:

गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ व्यक्ती आणि ५ संस्था यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने यावर्षी आपल्या वर्धापनदिनी एक कौतुकास्पद व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २०२६ च्या वर्धापनदिनानिमित्त कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना ‘विशेष कार्यसन्मान पुरस्कार’ देण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. महिला सक्षमीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून हा विशेष सन्मान केला जाणार आहे. सेवा काळात या महिला स्टेशन मास्तरांनी दाखवलेले कमालीचे प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे संरक्षण, रस्ता चुकलेल्यांची त्यांच्या घरच्यांशी घडवून आणलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य आत्महत्या आणि कसोटीच्या वेळी दाखवलेले धैर्य व तत्परता याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

​बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडूरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकांवर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांना या पुरस्कारांतर्गत व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देऊन गौरविण्यात येणार आहे. ३१ मे २०२६ अखेर कार्यरत असलेल्या महिला स्टेशन मास्तरांसाठी हा एकच निकष लावून ही निवड करण्यात आली आहे. या सन्मानमूर्तींमध्ये ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यातील असून १० जणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. कोकण रेल्वेच्या सेवा नियमांचे पालन करून या उपक्रमांतर्गत गौरविमूर्तींना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ दिला जाणार नाही. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहकार्य केले आहे.

​पुरस्कार जाहीर झालेल्या १७ महिला स्टेशन मास्तरांचा सेवाकालावधी ४ वर्षे ते ३० वर्षे असा व्यापक आहे. यामध्ये मडूरे स्टेशनच्या प्रतीक्षा लक्ष्मण गावकर या सर्वात सेवाज्येष्ठ आहेत, तर रत्नागिरी स्टेशनच्या चैताली राजेंद्र कल्याणकर या सर्वात तरुण स्टेशन मास्तर आहेत. एकूण १७ पैकी १५ महिला स्टेशन मास्तर मुळच्या कोकणातीलच रहिवासी आहेत. यापैकी सौ. अनुराधा रितेश पवार या सावंतवाडी स्थानकावरून जून २०२६ मध्ये २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी एकूण ९ महिला स्टेशन मास्तर या रेल्वेसाठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त गटातील आहेत, २ जणी अनुकंपा तत्त्वावर लागून पदोन्नती झालेल्या आहेत, तर उर्वरित ६ महिला थेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यातील ३ जणींचे पतीसुद्धा कोकण रेल्वेमध्येच कार्यरत आहेत. तसेच सौ. अनघा राजाराम नाटेकर यांनी १९९५ मध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रोजंदारीवर देखील काम केले होते, ही एक गौरवास्पद बाब आहे.

​या गौरविमूर्तींपैकी ५ जणींना विविध वर्षी कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या (CMD) पुरस्काराने आधीच सन्मानित करण्यात आलेले आहे. २ जणींना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे १००० रुपयांचे विशेष रोख पारितोषिक, तर २ जणींना रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक यांचे विशेष प्रमाणपत्र आणि १००० रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच चैताली राजेंद्र कल्याणकर यांना त्यांच्या कार्यमूल्यमापनात प्रथम आल्यामुळे ‘केआरए’ पुरस्कार प्राप्त आहे, तर सौ. मनीषा हरिश्चंद्र तटकरी यांना दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दोन वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.

​पुरस्कार प्राप्त १७ महिला स्टेशन मास्तरांमध्ये मनीषा हरिश्चंद्र तटकरी (कळंबणी बुद्रुक), अस्मिता तुकाराम सावंत (खेड), श्रद्धा समीर चिले (खेड), शिल्पा शंकर दपके (चिपळूण), निकिता निलेश पवार (कडवाई), अनघा राजाराम नाटेकर (रत्नागिरी), चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी), प्राजक्ता प्रदीप कांबळे (खारेपाटण), अंजली श्रीराम चाळके (नांदगाव), मनस्वी सुभाष कदम (नांदगाव), विशालम दिनेश बेटकर (कणकवली), रंजना दीपक माने (कणकवली), सुविधा इमानवेल स्वामी (सिंधुदुर्ग), मेघा कमलाकर नागवेकर (सिंधुदुर्ग), प्रज्ञा भालचंद्र नाईक (झारप), अनुराधा रितेश पवार (सावंतवाडी) आणि प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडूरे) यांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील पहिल्या १० दिवसांत एकूण १२ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी प्रत्यक्ष केला जाणार असून, उर्वरित ५ महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल, अशी माहिती बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी दिली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search