पालघर:
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना उद्या, म्हणजेच २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत अधिकृत आदेश जारी करून ही माहिती दिली आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था उद्या पूर्णपणे बंद राहतील. मात्र, या सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


