मुंबई: राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून, हवामान विभागाकडून कोकण किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारपासूनच पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझड झाल्याच्या घटना समोर येत आहेत.
कणकवली शहरामध्ये या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून, तेथील सुमारे ४० वर्षे जुन्या असलेल्या भाजी मार्केटचा एक भाग मंगळवारी अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि लगतच्या भागात पुढील ४ ते ५ दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे


