Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या नियमित गाड्यांची क्षमता वाढवा

   Follow us on        

मुंबई:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे आक्रमक पावले उचलण्याची मागणी केली आहे. सध्या रोहा ते मडगाव दरम्यानचा कोकण रेल्वेचा मार्ग तब्बल १६८% क्षमतेने धावत असून, रेल्वे मार्गाच्या मर्यादेमुळे नवीन गाड्या सोडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत, उपलब्ध गाड्यांनाच कमाल डबे (Coaches) जोडून क्षमता वाढवणे हाच एकमेव प्रभावी आणि किफायतशीर उपाय असल्याचे समितीने म्हटले आहे. कोकण विकास समितीच्या नागरी व ग्रामीण विभागाचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी याबाबत रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि संबंधित रेल्वे विभागांना सविस्तर प्रस्ताव पाठवून त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

​समितीने दिलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने १० महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ८ वरून २० डब्यांची करणे, मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या १६ वरून २२ डब्यांच्या करणे, तसेच सावंतवाडी-दिवा आणि रत्नागिरी-दिवा एक्सप्रेस २२ डब्यांपर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय तुतारी एक्सप्रेस, मडगाव-बांद्रा एक्सप्रेस, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्याही त्यांच्या कमाल क्षमतेने चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीसाठी मडगाव येथे पिट लाईनची लांबी वाढवणे किंवा काही गाड्यांचे टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) किंवा दादर येथे हलवून या तांत्रिक अडचणींवर मात करता येऊ शकते, असा पर्यायही समितीने सुचवला आहे.

​हा प्रस्ताव तातडीने मंजूर झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ४५ अतिरिक्त डबे उपलब्ध होतील, ज्यामुळे प्रवाशांसाठी दररोज तब्बल ३,६९१ अतिरिक्त जागा (Seats) निर्माण होऊ शकतील. हा बदल म्हणजे या संतृप्त (saturated) मार्गावर एकही नवीन ट्रेन न चालवता, दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन नवीन पूर्ण लांबीच्या गाड्या सुरू करण्यासारखेच आहे. वर्षभर आरक्षणासाठी लागणाऱ्या लांबच लांब प्रतीक्षा याद्या आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवण्यासाठी रेल्वे बोर्डाने यावर कालबद्ध नियोजन करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search