आंबोली:
येथील मुळवंदवाडी भागात जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीच्या (वीज तारेच्या) संपर्कात आल्याने एका गाभण म्हशीसह रेडकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुळवंदवाडी येथील शेतकरी भिसाजी महादेव सरमळकर यांची गुरे शेतात चरण्यासाठी गेली असता हा अपघात झाला. या घटनेत शेतकरी सरमळकर यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, परिसरातील नागरिक गणपत गावडे यांनी प्रसंगावधान राखत इतर जनावरांना पुढे जाण्यापासून रोखल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच महावितरण आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने मृत गुरांचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, बाधित शेतकरी सरमळकर यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने गुरांचे मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान, आंबोलीतील नांगरतास भागात नव्याने बसविण्यात आलेले विद्युत पोल धोकादायक स्थितीत असल्याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


