सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शनिवारी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे एक मोठी धडक कारवाई केली. गोव्याहून मुंबईकडे अवैध रित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘टाटा सिग्मा’ दहा चाकी ट्रकवर पोलिसांनी छापा टाकला. या ट्रकमधून तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दारूसह ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी ट्रकचालक विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


