Konkan Railway: महिला राखीव डब्यात हुल्लडबाजी करणार्‍या तरुणांवर खेड स्थानकावर आरपीएफची कारवाई

   Follow us on        

Konkan Railway: एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या (गाडी क्रमांक १२६१८) महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून हुल्लडबाजी करणाऱ्या हुल्लडबाज तरुणांविरोधात कोकण रेल्वे प्रशासनाने खेड रेल्वे स्थानकावर तातडीने मोठी धडक कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) मदतीने संबंधित तरुणांना डब्यातून बाहेर काढून त्यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​प्राथमिक माहितीनुसार, काही तरुणांनी महिला राखीव डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. हे तरुण डब्यात सिगारेट ओढत होते आणि गुटखा खाऊन धूर व दुर्गंधी पसरवत होते. या हुल्लडबाजीमुळे आणि त्रासामुळे डब्यातील महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रकार समोर आला.

​या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने दखल घेत रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधला. ट्रेन रोहा स्थानक पार करून पुढे निघून गेल्यामुळे, पुढील प्रमुख स्थानक असलेल्या खेड रेल्वे स्थानकावर कारवाईची आखणी करण्यात आली. गाडी खेड स्थानकात दाखल होताच तेथे आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलिसांच्या पथकाने महिला डब्याला चहुबाजूने वेढा घातला.

​पोलिसांना पाहताच डब्यातील काही हुल्लडबाजांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. या वेळेवर झालेल्या धडक कारवाईमुळे संभाव्य अनुचित प्रकार टळला असून महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला असून, तत्परतेने पावले उचलणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search