महाराष्ट्रात रेड अलर्ट; खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

   Follow us on        

मुंबई:

मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस म्हणजेच ८ जुलैच्या रात्रीपर्यंत राज्यामध्ये मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व खासगी कंपन्या आणि आस्थापनांना अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (Work From Home) सवलत द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जे कोणी या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

​राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना आणि आपत्कालीन यंत्रणांना २४ तास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या (Landslide) दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही (Mumbai Pune Expressway) मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून समुद्रातील हायटाईडचा धोका लक्षात घेता NDRF आणि SDRF च्या तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

​दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी तब्बल ३०० मिलिमीटरहून अधिक म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे राज्यात आतापर्यंत ९ जणांचा बळी गेला असून खडकवासला धरणातूनही कधीही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search