मुंबई: महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच समावेश झाल्यामुळे, राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या सर्व किल्ल्यांवर भव्य ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये रायगड, शिवनेरी, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग आणि राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनाने ६० लाख रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली असून, प्रत्येक किल्ल्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या महोत्सवांच्या माध्यमातून पर्यटकांना शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. यासाठी विविध लोककला प्रकार, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, शिवकालीन इतिहासावर आधारित नाट्यप्रयोग, व्याख्याने, ऐतिहासिक प्रदर्शने आणि दुर्गसंवर्धन विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमामुळे देश-विदेशातील पर्यटकांमध्ये किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होईल, स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, तसेच पर्यटन, हॉटेल व स्थानिक हस्तकला व्यवसायांना मोठी चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


