मुंबई: केंद्र व राज्य शासनाने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) अनिवार्य केली असून, यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले होते आणि याची मुदत ३० जून रोजी संपली आहे.
परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०१९ अखेर नोंदणीकृत असलेल्या सुमारे १४ लाख ६७ हजार ७४२ वाहनांपैकी १० जून २०२६ पर्यंत केवळ ६ लाख २८ हजार ६२४ वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, तर सुमारे ८ लाख ३९ हजार वाहनांनी अद्याप नोंदणीच केलेली नाही. वारंवार आवाहन करूनही निम्म्याहून अधिक वाहनचालकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने, शहरात अजूनही लाखो वाहने विना-एचएसआरपी धावत असून आजपासून (१ जुलै) अशा वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे.


