मालवण (प्रतिनिधी):पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! मालवणमध्ये या तारखेपासून जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद मालवणमधील यंदाच्या पर्यटन हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू असून, आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स) प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश २६ मे २०२६ पासून ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. मालवणच्या पर्यटनात सागरी व खाडीतील जलपर्यटनाचे मोठे महत्त्व असून दरवर्षी १ सप्टेंबर ते २५ मे असा हा जलपर्यटनाचा अधिकृत हंगाम असतो. सध्या मे महिन्यात या हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालवण बंदर निरीक्षकांनी अधिकृत पत्र काढून ही बंदी जाहीर केली आहे.
प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या १३ मे २०२६ च्या पत्राचा संदर्भ देऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनलँड व्हेसल्स ऍक्ट, १९१७’ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व जहाजांना, बोटींना आणि जलवाहनांना या मान्सून काळात सुरक्षेच्या कारणास्तव आपली वाहतूक आणि व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २६ मे ते ३१ ऑगस्ट या पावसाळी कालावधीत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, सर्व प्रकारच्या जलक्रीडा, नौकाविहार (बोटिंग) आणि स्कुबा डायव्हिंग या सेवा पूर्णपणे बंद राहतील.
हा आदेश मालवणमधील एकूण ३९ प्रमुख संस्था, गृहनिर्माण व पर्यटन सोसायट्या आणि वैयक्तिक बोट चालकांना थेट बजावण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, चिवला जलपर्यटन संस्था, तारकर्ली, देवबाग, दांडी येथील बोटिंग संघटना व वॉटर स्पोर्ट्स संस्था, तसेच स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक आणि वैयक्तिक बोट मालकांचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा धोकादायक परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे ही आवश्यक खबरदारी घेतली जाते.


