मुंबई : कोंकण रेल्वेने आज मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २२२२९/२२२३०) च्या ३ वर्षांच्या यशस्वी सेवेचा उत्सव साजरा केला. २७ जून २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात आलेल्या या ट्रेनने कोंकण मार्गावरील रेल्वे प्रवासात आमूलाग्र बदल घडवला आहे.
मुंबई ते गोव्याच्या मडगाव दरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील १९वी वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि कोंकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत सेवा आहे. सुमारे ७६५ किलोमीटर अंतर कापणारी ही ट्रेन सध्या आठ डब्यांची (मिनी वंदे भारत) आहे. गैर-मान्सून काळात ती सुमारे ७ ते ८ तासांत प्रवास पूर्ण करते, तर मान्सूनमध्ये वेळ जास्त लागतो. ट्रेनचा सरासरी वेग ७०-७५ किमी/तास आहे. ही ट्रेन आठवड्यात सहा दिवस धावते. तर पावसाळी वेळापत्रकात ही गाडी आठवड्यात तीन दिवस चालविण्यात येते.
प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा, उच्च सुरक्षा, आरामदायक सीटिंग, वायफाय, खाद्यपदार्थ आणि वेगवान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या या ट्रेनला कोकणात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कोंकण रेल्वेच्या मते, या ट्रेनने प्रवासाला गती, सुरक्षा, आराम आणि आधुनिक अनुभव दिला आहे.
कोंकण रेल्वेने या निमित्ताने सर्व प्रवाशांचे आभार व्यक्त केले असून, भविष्यात अधिक चांगल्या आणि विस्तारित सेवेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. ही सेवा ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात आली असून, कोंकणातील पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणारी ठरली आहे.


