मुंबई:
शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी आता सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात व्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. तसेच, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अनेकदा शेतकरी कुटुंब लग्न किंवा इतर शुभकार्यासाठी ट्रक, डंपर किंवा इतर अवैध वाहनांचा वापर करतात, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर, शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असल्यास आणि त्यांनी एसटीकडे मागणी केल्यास, एसटी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एसटी आणि बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर ताण वाढला असून, याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. काही मार्गांवर सध्या प्रत्येक तासाला, तर पुढील दोन-तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


