रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक गट गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. शनिवारी सकाळच्या सुमारास या गटातील काही पर्यटक समुद्रात उतरले. मात्र, अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे या गटातील पाच जण खोल पाण्यात वाहून गेले. अवघ्या काही क्षणांतच ते नजरेआड झाल्याने किनाऱ्यावर एकच गोंधळ आणि खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि व्यावसायिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. समुद्रातील वेगवान प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अनेक अडथळे येत आहेत, तरीही बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर ही शोधमोहीम राबविली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम वेगाने सुरू आहे. या भीषण दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


