धक्कादायक! शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले कोसळली

   Follow us on        

बांदा: बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले विद्यार्थ्यांसमोर अचानक खाली कोसळली, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मुख्याध्यापिका आत्लेषा कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असताना ही घटना घडली असून, काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

​या गंभीर घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर आणि महेंद्र मांजेरकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छातासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था आणि खेळणी साहित्यांची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली असून, ऋतिका नाईक यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search