सिंधुदूर्गनगरी:
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार यादी अधिक अचूक, अद्यावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती देऊन शुद्धीकरण अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. जर मतदाराने हा अर्ज भरला नाही, तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळी देखील उपस्थित होते. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्य बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार नोंदणीकृत असून, त्यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच मतदार नोंदणीच्या मॅपिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या मोहिमेच्या नियोजनानुसार, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत आणि शुद्धीकरण अर्ज भरून घेऊन मतदारांची स्वाक्षरी घेतील. मतदार घरी नसल्यास कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडून आवश्यक माहिती घेऊन अर्ज भरला जाईल. जर मतदार घरी आढळला नाही, तर बीएलओ संबंधित पत्त्यावर तब्बल तीन वेळा भेट देतील. तरीही आवश्यक माहिती अथवा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाव वगळले गेले तरी नियमानुसार पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध राहणार असली, तरी त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज भरून द्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर ५ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर प्राप्त होणारे दावे व हरकतींची सुनावणी करून शेवटी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अंतिम मतदार यादी’ प्रकाशित केली जाणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
२० ते २९ जून: कर्मचारी प्रशिक्षण व पूर्वतयारी
३० जून ते २९ जुलै: बीएलओंच्या घरोघरी भेटी व अर्ज संकलन
२९ जुलैपर्यंत: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: दावे व हरकती दाखल करणे
५ सप्टेंबर: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे
७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे


