सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील वरवडे संगम पॉईंट येथील गडनदी पात्रात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल येथे घडली. मृत युवकाचे नाव हरीकृष्णन टी मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) असून नदी पात्रातील एका मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरून नदीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हा तरुण आणि त्याचा मित्र या ठिकाणी फिरायला आले होते. मात्र सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो बुडाला. ही घटना त्याच्या मित्राने त्या युवकाच्या घरी कळवली. तेव्हा त्या बुडालेला हरीकृष्णन यांचा काका आणि नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्र झाल्याने शोध लागला नव्हता. आज कणकवली पोलिसांनी पुन्हा सकाळी भोरपी समाजाच्या लोकांना घेऊन नदीत शोध मोहीम राबवली. वरवडे नदीपत्रात पाण्यात हरीकृष्णन यांचा मृतदेह सकाळी ७ वाजता आढळून आला.पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम यशस्वी झाली. हरीकृष्णन याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मालवण – उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.
पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.
विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर,
जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मुंबई |जमीनविषयक दस्तऐवज नागरिकांना सहजासहजी उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा या आधी फक्त राज्यात फक्त ७ जिल्ह्यापुरती मर्यादित होती ती आता २४ जिल्ह्यात विस्तारित केली आहे.
यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सातारा, सोलापूर,सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम,वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे.
जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती मिळवण्यासाठी आता सरकारी कार्यालयात फेरे मारण्याची गरज नाही.
ही माहिती मिळवण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन रजिस्टर करणे गरजेचे आहे. एकदा रजिस्टर केल्यानांतर तुम्हाला ज्या जमिनीची माहिती पाहिजे त्या जमीनीचा सर्वे/हिस्सा नंबर टाकून काही चार्जेस भरून जतन केलेले दस्तऐवज मिळवता येतील.
एकूण ६४ प्रकारचे अभिलेख तुम्हाला या संकेतस्थळावरून मिळवता येतील
सावंतवाडी – प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार कि नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी लिहिलेल्या एका पत्राला सावंतवाडी नगरपरिषदेने दिलेल्या उत्तरामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातील ज्या रिंग रोड मधून जाणार होता त्या रिंग रोड बाबत काय ठराव झाला याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी याबाबत कोणताही ठराव झाला नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण झाला होता . बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली चालू होत्या. मात्र विरोध झाल्याने केंद्राने हा मार्ग आंबोली – माडखोल – सावंतवाडी – इन्सुलि मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा मार्ग सावंतवाडी शहरात रिंग रोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी सावंतवाडी नगरपरिषदेत याबाबत साधा ठराव पास झाला नसल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या बाहेरून जातो. रेल्वेमार्ग सुमारे आठ किलोमीटर दूर अंतरावरून नेण्यात आला आहे. येथे विकासासाठी पूर्ण वाव असुनही सावंतवाडी शहर विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. त्यामुळे निदान प्रस्तावित संकेश्वर-बांदा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.
दोडामार्ग – कोकणात हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने एक नवीन कल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्हा सीमेवर हत्तींचे अभयारण्य उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कल्पना वास्तवात आणल्यास हे अभयारण्य देशातील केरळ मधील कुट्टूर आणि उत्तरप्रदेश येथील हत्ती संवर्धन केंद्रानंतर हत्तीं साठी तिसरा उपक्रम ठरणार आहे..
श्रीलंकेतील पिन्नावाला अभयारण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या कोकणी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत जंगली हत्तीना हक्काचं घर देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या अभयारण्या मूळे एक नाही तर दोन फायदे होणार आहेत. शेतकर्यांना हत्तींच्या उपद्रवापासून मुक्ती मिळणार आहे. दुसरे म्हणजे या अभयारण्यामूळे कोकणातील पर्यटनास हातभार लागणार आहे.
श्रीलंकेतील पिन्नावाला हत्ती अभयारण्य
श्रीलंकेत १९७५ साली Department of Wildlife Conservation अंतर्गत ‘The Pinnawala Elephant Orphanage’ ची स्थापना झाली. हत्तींना नीट खाद्य मिळावं, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी हा हत्तींचा अनाथाश्रम उभारला गेला. त्यासाठी नदीकाठी २५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली. जवळपास १०० हून अधिक हत्ती तिथे राहतात. तिथे हत्तींचे प्रजनन (breeding) देखील केले जाते. अभयारण्याच्या स्थापनेपासून २०१५ पर्यंत ७० नव्या हत्तींचा जन्म झाला. काहींना जंगलात सोडलं तर काहींना खासगी मालकांकडे. परंतु त्यांची नीट काळजी घेतली जाते की नाही याचं tracking एकदम काटेकोरपणे ते करतात. म्हणजेच काय तर असलेले हत्ती वाचवले, जगवले, वाढवले आणि एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले! जगातील सर्वात जास्त हत्ती एका ठिकाणी असलेलं हे पिन्नावाला गाव. असं क्वचितच होतं की पर्यटक श्रीलंकेला जातात आणि तिथे जात नाही. पर्यटक हमखास तिथे भेट देतातच. आणि तेही तिकिट काढून भेट देतात. आपल्याला हत्तींना अंघोळ घालता येते. त्यांना जेवण देता येतं. त्यावर मनसोक्त फिरता येतं. आणि या सगळ्यासाठी थोडे बहुत पैसे घेतले जातात. त्या पैशातून तेथील देखभाल केली जाते. पर्यावरण जपत, प्राण्यांची काळजी घेत एक अगळं वेगळं पर्यटन ‘रोल मॉडेल’ श्रीलंकेने उभं केलंय.
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून चालकांनी आज २१ एप्रिलपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काल के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.
जिल्हयातील वाळू/रेती व अन्य गौण खनिजाच्या वाहतुकीवेळी झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या वाहतुकीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्य सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.
बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.
रत्नागिरी | विजय सावंत : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले येथील टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.
या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे NHAI म्हणने आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.
याआधी पण येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली चालू केली होती. मात्र स्थानिकांचा त्याला मोठा विरोध झाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती.
महामार्गावर अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळे येत आहेत. या ठिकाणावरून गाड्या खूप कमी वेगाने आणि सांभाळून चालवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक बाबीत कमतरता असल्याने अपघात होत आहेत. आमचा टोल वसुली करिता विरोध नाही पण महामार्गाचे काम अपूर्ण असताना आणि फक्त काही भागाचे काम पूर्ण झाले असा दावा करून टोल वसुली करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे या महामार्गाला 12 वर्ष रखडवून येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला; त्यात भर म्हणुन या अपुऱ्या महामार्गावर टोल वसुली करून प्रशासन त्यांचा रोष ओढवून घेणार आहे.
सिंधुदुर्ग-कोकणात पर्यटन वृद्धीस मोठा वाव आहे; त्याचबरोबर काही मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील गुंतवणूक कित्येक पटीने परतावा देणारी असल्याचे लक्षात आल्याने अनेक परप्रांतीय येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा बळजबरीने, गैरमार्गाने जमिनी बळकावण्याचे प्रकारसुद्धा घडताना दिसत आहेत.
गोव्यात हल्लीच उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्याच्या भूमाफियांनी सिंधदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपले पाय पसरवण्यास सुरवात आहे. त्यांनी या जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात शिरकाव केला असून कायद्यातील पळवाटा, आर्थिक ताकद याचा वापर करत यंत्रणेला हाताशी धरून सोन्याच्या किमतीच्या जमिनी कवडीमोल दाम देवून आपल्या विळख्यात आणायला सुरूवात केली आहे. गोव्यात या भूमाफियांना ‘दिल्ली लॉबी’ असे बोलले जात आहे. मुळात दिल्ली लॉबी म्हणजे दिल्ली प्रांतातून येणारे गुंतवणूकदार आहेत.
या दिल्ली लॉबीने गोव्यात नक्की काय केले ?
ही लॉबी अवैध मार्गांचा वापर करून पैशाच्या जोरावर मालमत्ता मिळवते. स्थानिकांना सुरूवातीला आमिषे आणि नंतर बळाचा वापर करून बेदखल करतात; मात्र ते कधीच प्रत्यक्ष पडद्यावर येत नाहीत. गोव्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस हे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने दिल्लीतील असतात. त्यांच्याशी ओळख काढून त्यांचा वापर करत या मालमत्ता मिळवल्या जातात. हे दिल्लीकर मोठमोठ्या हस्तींकडून गुंतवणुकीसाठी पैसे मिळवतात. स्थानिकांना आमिष दाखवून त्यांनाच पुढे करून अवैध मार्गाद्वारे मालमत्ता बळकावल्या जातात. मग त्याची दामदुप्पट व्यावसायिक किमतीत विक्री होते. यात करोडो रूपयांचा घोटाळा केला जातो.जमिनी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, मृत व्यक्तींच्या बोगस स्वाक्षरी, बोगस वारस आदी सगळे मार्ग अवलंबले जातात. गोव्यात गेल्या काही वर्षांत या लॉबीने आर्थिक दहशत निर्माण केली आहे.
गोव्यात असलेली पोर्तुगीजकालीन बंद घरे या लोकांच्या दृष्टीस पडली. ही घरे प्रामुख्याने वर्षानुवर्षे बंद असल्याने पडझड झालेल्या स्थितीत असायची. त्याचे वारसदार परदेशात स्थायिक असायचे. या लोकांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून त्याचे वारसदार शोधले. मुळ दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीमुळे त्यांना हे सहज शक्य झाले. या वारसदारांकडून कवडीमोल किंमतीने मालमत्ता घेतल्या.त्या घरांची दुरूस्ती करून तीन चार पट दराने याची विक्री केली गेली.
त्यानंतर या लॉबीची नजर गोव्यातील हजारो एकर पडीक जमिनीवर पडली. येथे वारस परदेशात असलेल्या, वारसांना मालमत्तांबाबत माहिती नसलेल्या हजारो एकर जमिन होत्या. अधिकाऱ्यांशी साटेलोटे ठेवून असलेल्या या लॉबीने गोव्याच्या पुराभिलेख खात्यामधून अवैध मार्गाने कागदपत्र मिळवत अशा जमिनींचे वारस शोधले. काहीवेळा अशा वारसांना पैसे देवून कवडीमोल किंमतीने जमिनी खरेदी केल्या. या पुढचे पाऊल टाकत वारसांचा पत्ता नसलेल्या जमिनींचे बोगस वारस उभे केले. निधन झालेल्या किंवा ज्ञान नसलेल्या लोकांच्या नावेही बोगस मालक दाखवून खरेदी व्यवहार करण्यत आले. यासाठी पुराभिलेख, महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाच्या लोकांना लाच देवून बनावट खरेदीखते करण्यात आली. ग्रामिण भागात हजारो एकर जमिनी यातून खरेदी करून त्याची विक्रीही केली.
परदेशातून परत आलेल्या काही नागरिकांनी आपली जमिनीची परस्पर विक्री झाल्याबद्दल ची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हा मोठा घोटाळा बाहेर पडला.
सिंधुदुर्गात प्रवेश.
मोपा विमानतळामुळे दोडामार्गमध्ये मालमत्तांना दर येणार याची आधीच कुणकुण असलेल्या या लॉबीने तालुक्यात वैध अवैध मार्गांचा वापर करून मोठ्याप्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. खरेदीदार कागदावर वेगळे असले तरी यामागे मुळ हीच लॉबी असून बळाचा वापर तेच करत असल्याचे चित्र आहे.
आताही हैदराबाद-पणजी असा मोठा महामार्ग भविष्यात होणार असल्याचे व तो दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावातून जाणार असल्याची कुणकुण या लॉबीला आहे. याची राज्यस्तरावरच्या प्रशासनाला अधिकृतरित्या कोणतीच माहिती नाही; मात्र ही लॉबी त्या मार्गावरील जमिनी कवडीमोल किंमतीने खरेदी करत आहे. यासाठी यंत्रणेचा वापर आणि स्थानिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एका गावात या लॉबीची छुपी गुंतवणूक काही वर्षांपूर्वीपासून आहे. या ठिकाणी स्थानिकांना कवडीमोल किंमत देवून व इतर मार्गाने जमिनी घेण्यात आल्या. त्या ठिकाणी आलीशान घरे, सदनिका तयार करण्यात आल्या. त्या आता विक्रीसाठी सज्ज असून त्यासाठीचे ग्राहकही करोडो रूपये मोजणारे शोधले जात आहेत.
गोव्यात घोटाळा उघडकीस आला तरी या लॉबीचे व्यवहार सिंधुदुर्गात चालूच आहेत. कारण सध्या हा भाग अविकसित असला तरी येथे येणारे भविष्यातील प्रकल्पांमुळे येथे विकासाला मोठा वाव आहे. भविष्यात ही लॉबी राजापूर-रत्नागिरीसुद्धा शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणती खबरदारी घ्याल?
कोकणातील अनेक लोक नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असतात. त्यांच्या जमिनीवर या भूमाफियांचा डोळा असतो. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन परस्पर विकल्या जाऊ शकतात. आपल्या गावात-वाडीत जमिनी बद्दल जेवढे फेरफार होतात त्याबद्दल हरकती नोंदविण्यास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या शासकीय संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केली जाते. या चावडी वर आपण नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपला सातबारा वारंवार तपासून त्यामध्ये काही फेरफार झाले आहेत का ते पाहणे महत्वाचे आहे.
सिंधुदुर्ग : घर ते शाळा यांमधील जास्त अंतर, वाहतुकीची सोय नाही या कारणामुळे अनेकदा पालक मुलींना शाळेत पाठवणे टाळतात. अशा मुलींसाठी आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात एक स्तुत्स्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३७९ मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी ११० मुलींना मोफत सायकल देऊन शुभारंभ करण्यात येणार आहे. हा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी नसून कायम चालू राहणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत.
कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये जेव्हा मुली शाळेकडे जातात.त्यांना शाळेत पोहचण्याची अडचण होते.काही शाळा दूर असल्याने पालक मुलींना लीं पाठवत नाहीत किंवा संध्याकाळी उशिरा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहून मुलींना शाळेत पाठवले जात नाही .माझ्या मतदार संघातील शिक्षणापासून एकही मुलगी वंचित राहू नये, यासाठीच कणकवली विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलींनी असे नितेश राणे एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडून अशा गरजू मुलींची यादी मागवली जाणार आहे. यादीप्रमाणे गरजू मुलींसाठी त्या शाळेला सायकल दिली जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना ही सायकल शाळेकडे पुन्हा द्यावी लागणार आहे. ती सायकल कंडिशन तपासून त्याच शाळेतील इतर गरजू मुलींना दिली जाईल.