Category Archives: सिंधुदुर्ग
यश सावंत | सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही.
विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.
.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?
गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला नको.
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाची मागणी
सिंधुदुर्ग :प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे.त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उपाख्य बापू सावंत, संचालक अरुण पालकर, विलास मळगावकर आदींनी हे निवेदन दिले आहे. पूर्वीपासून श्री गणेमूर्ती मातीच्या बनवल्या जात असत; परंतु गेल्या ८ ते १० वर्षांपासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती जिल्ह्यात आयात केल्या जात आहेत. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर त्या बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे.
पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.
आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.
आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.











