Category Archives: सिंधुदुर्ग

Mumbai Goa Highway | ओसरगाव टोल वसुलीला विरोध करण्यासाठी नेते वसुली नाक्यावर दाखल; वातावरण तापणार..

Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र या टोलवसुली वरून येथील वातावरण तापून तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला होता. ही मागणी पूर्णपणे मान्य न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना 50% सुट मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटणार आहेत. टोलविरोधी कृती समिती सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाली आहे, त्यामुळे आज ओसरगाव टोलनाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानमधील कंपनीला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते.

ओसरगाव येथील टोल नका उद्यापासून सुरु | असे असणार टोलचे शुल्क

सिंधुदुर्ग | मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या दिनांक १४ जूनपासून  सुरू होणार आहे  अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. 
ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे. 
एकवेळ प्रवासासाठी  असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर 
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९५ रुपये मिनी
बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १५५ रुपये
ट्रक आणि बस (२ अक्सेल) : ३२० रुपये 
व्यावसायिक वाहने ३ अक्सेलसाठी : ३५० रुपये
मल्टी अक्सेल ४ ते ६ अक्सेल वाहनांसाठी : ५०५ रुपये. 
सात किंवा त्याहून जास्त अक्सेल वाहनांसाठी : ६१५ रुपये 
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३३० रुपये मासिक पास शुल्क राहील.
या आधी पण येथे टोल नका सुरु करण्यात आला होता. मात्र महामार्गाचे  काम अपूर्ण असल्याने टोल वसुली करण्यात येऊ नये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्ण टोल माफी मिळावी असा आग्रह धरून या वसुलीला विरोध झाला होता. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार असल्याने टोल विरोधकांची  कोणती भूमिका असेल याबाबत  उत्सुकता आहे. 

मडुरा येथे शाळेचे छप्पर कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला | प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

 

सिंधुदुर्ग | महाराष्ट्रात शिक्षण विभागाच्या ग्रामीण भागातील शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र तळकोकणतील एका घटनेने ही गोष्ट अधोरेखित झाली आहे. मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने तसेच शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने अनर्थ टळला आहे. मात्र वासे व मंगलोरी कौलांचे नुकसान झाले आहे. 

प्रशासनाचे दुर्लक्ष 

दोन दिवसांनी शाळा चालू होणार होती याकाळात दिवसा हे छप्पर पडले असते तर मोठा अनर्थ घडला असता. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र,शिक्षण विभाग अधिकार्‍यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाआहे.मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीनेग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळीका रणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती.

 

 

Sawantwadi Railway Terminus | रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी तरुण वर्ग पुढे सरसावला..

सिंधुदुर्ग |सावंतवाडी टर्मिनसच्या फेज-1 चे काम पूर्ण होवून फेज-2 चे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे सर्व गाड्यांना थांबा मिळणे शक्य होणार असल्याने हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रश्नासाठी सावंतवाडी तालुक्यातील तरुण वर्ग पुढे आला आहे. रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागावे तसेच या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबा देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू व सावंतवाडी रोट्रॅक्ट कल्ब अध्यक्ष मिहिर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज खासदार राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भावेश भिसे ,साहिल नाईक, प्रणय गावडे, रौनक रेडीज आदी उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून सतत पाठपुरावा सुरू आहे. टर्मिनस झाल्यावर विशेषतः सर्वच रेल्वेना थांबा मिळेल. तसेच रेल्वे स्टेशनवर पाणी भरण्याची सुविधा निर्माण होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी धन्यवाद दिले. रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ते काम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वच गाड्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई-गोवा महामार्गामुळे ‘हे’ गाव ठरले कमनशिबी; रोजगारावर झाला परिणाम

सिंधुदुर्ग | रस्त्यांमुळे विकास होतो; गाव आणि शहर यातील अंतर कमी होऊन रोजगाराच्या संधी वाढतात हे खरे असले तरी  मुंबई-गोवा महामार्गामुळे एका गावाच्या रोजगारावर पर्यायाने येथील गावकऱ्यांच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झाला आहे. . मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बिबवणे गाव आहे.  मुंबई-गोवा महामार्ग दोन पदरी असताना या गावातील येथील शेतकरी खुश होता. त्याचे कारण असे की या गावात मोठ्या प्रमाणात कलिंगडे पिकवली जात होती आणि ती या महार्गावर दुतर्फा विकली जात होती. महामार्गाचा विस्तार सुरू होण्यापुर्वी हे गाव हायवेलगतचे कलिंगड विक्रीचे मोठे केंद्रच बनले होते. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे होती. तसेच गावकऱ्यांनी तात्पुरती दुकाने उभी केली होती. तात्पुरती बैठक व्यवस्था कलिंगड उत्पादकांनी हायवेलगत केली होती. प्रवाशांच्या गाड्या यायच्या, येथे विसावा घ्यायच्या आणि कलिंगड खाऊन, खरेदी करून पुन्हा प्रवासाला मार्गी लागायच्या. तेव्हा येथे दुकांनांची संख्याही अधिक होती. येथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार या कलिंगड विक्रीद्वारे मिळत असे.
मात्र आता चित्र पालटले आहे. गेल्या काही वर्षात हा महामार्ग चौपदरी झाला आणि तेव्हापासून या गावाचे उत्पन्नही घटू लागले. कारण आता या महामार्गावरून गाड्या सुसाट जातात. आता येथे गाड्या क्वचितच थांबतात. त्यामुळे कमी प्रतिसादामुळे अनेक दुकाने बंद करण्याची नामुष्की येथील शेतकऱ्यांवर आली आहे. आता काही मोजकीच दुकाने येथे राहिली आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पन्न पण कमालीचे घसरले आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सावंतवाडी – कुडाळात; असा आहे दौरा कार्यक्रम…

सिंधुदुर्ग | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  आज मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण.

सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी.

सकाळी 11.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण.

दुपारी 12 वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कुडाळ हायस्कुल कुडाळ.

दुपारी 2 वाजता कुडाळ हायस्कुल येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण.

दुपारी 2.30 वाजता मंत्री उदय सामंत, यांच्या निवासस्थानी, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.

दुपारी 3.15 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं.

4 वाजता चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

‘जन्मोजन्मी हीच पत्नी मिळूदे’; कुडाळात पुरुषांच्या वडाला फेऱ्या I समाजापुढे नवा आदर्श

सिंधुदुर्ग – जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते. पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून कुडाळमध्ये काही पुरुषांनी सुद्धा हे व्रत करून वडाला फेऱ्या मारल्या आहेत. यंदाचं नाही तर  गेली १४ वर्ष वट पोर्णिमेला ते व्रत करत आहेत. 
महिलांच्या बरोबरीने या पुरुषांनी वटवृक्षला फेऱ्या मारून आपल्या पत्नीप्रती आपली निष्ठा, आपलं प्रेम जपले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ संजय निगुडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १४ वर्षांपूर्वी हि परंपरा सुरु केली. कुडाळमध्ये श्री गवळदेव मंदिराकडे असलेल्या वटवृक्षाची पूजा करून त्याला फेऱ्या मारून हे व्रत पुरुषमंडळी सुद्धा करत आहेत. ही सर्व मंडळी आज सकाळी गवळदेव मंदिर इथं जमली. देवाला श्रीफळ ठेवून सांगणं करण्यात आले. त्यांनतर ब्राह्मणाच्या उपस्थितीत वटवृक्षाची पूजा करून त्याला सात फेरे मारण्यात आले. आपल्या पत्नीप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पुरुषाने हे व्रत करावे असे आवाहन यावेळी करण्यातआले.
पती-पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाक आहेत. दोघेही समान आहेत. पत्नी जर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, सौख्यासाठी हे व्रत करते तर आपल्या पत्नीचा सन्मान राखावा यासाठी महिलांप्रमाणे पुरुषांनी सुरु ठेवलेले व्रत खूप चांगले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

…. म्हणुन वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा देण्यात आला; माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले कारण

सिंधुदुर्ग | वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबा मिळाला नसल्याने कुडाळवासिय प्रवासी नाराज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एका स्थानकावर थांबा मिळणार हे निश्चित झाल्यापासून ते स्थानक कोणते असणार याबाबत प्रवाशांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.


साहजिकच तो थांबा या जिल्हय़ात मध्यवर्ती भागातील कुडाळ या स्थानकावर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या गाडीला अखेर कणकवली या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. 

कुडाळवासियांची नाराजी दूर करण्यासाठी  वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा का देण्यात आला याचे स्पष्टीकरण माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून काल केले आहे. त्यांच्या मते ”मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.”

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही मोजक्या खालीलप्रमाणे… 

मागील २ टर्म कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार/खासदार निवडून आले आहेत. याचा राग मनात ठेवून राणे परिवाराने कुडाळला डावलले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.

येथील आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ स्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून अपग्रेडेशनचे काम झाले नसल्याने थांबा मिळाला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे. 

सावंतवाडी स्थानकावर सर्व अपग्रेडेशन झाले आहे, एवढेच नव्हे तर या स्थानकाला टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. असे असूनही सावंतवाडी स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा का देण्यात आला नाही असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

 

वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा देण्यात यावा – अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिलाध्यक्ष

सिंधुदुर्ग | सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिलाध्यक्ष अर्चना घारे यांनी केली आहे. 
सीएसएमटी ते मडगाव या मार्गावर नव्याने वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. कोकण रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या ७ तासात पूर्ण करता येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसला ठाणे,चिपळूण ,रत्नागिरी व कुडाळ हेच थांबे देण्यात आले आहेत. मात्र सावंतवाडी सारख्या तळकोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर मात्र या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही बाब आदरणीय रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यास सावंतवाडी परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.तसेच सावंतवाडी हे या रेल्वे मार्गातील प्रमुख स्टेशन असून, परिसरातील पर्यटन स्थळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसचे काम गेल्या ५-६ वर्षांपासून प्रलंबित आहे.तसेच टर्मिनस 2 चे विस्तारीकरणाचे काम देखील प्रलंबित आहे.परिणामी या मार्गावर धावणाऱ्या २५-३० रेल्वे गाड्यांपैकी अवघ्या ९-१० गाड्या सध्या येथे थांबत आहे यामुळे लांबच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून यामुळे स्थानकाचा दर्जा देखील कमी होण्याची भीती आहे.तरी संबंधित प्रश्नाबाबत आपण सन्माननीय रेल्वे मंत्र्यांना समवेत चर्चा केल्यास सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे काम पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकेल व सावंतवाडी परिसरातील नागरिकांची, पर्यटकांची मोठी गैरसोय दूर होईल , अशी मागणी देखील केली आहे. 
यावेळी बोलताना आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,” सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनल दुरुस्तीचे काम तसेच वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी हे दोन्ही अत्यंत आवश्यक व तातडीचे कामे आहेत. याबाबत आपण स्वतः सन्माननीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच सावंतवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे”.

सिंधुनगरीत बीएसएनएलच्या टॉवरला भीषण आग; टॉवरवरील केबल व स्क्रॅप मटेरियल जळून खाक…

सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले. 

टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग. 

प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती. 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search