Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले त्याला” सावंतवाडी रोड ” असा फलक लावण्यात आला आहे त्याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले आहे.
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन दि.२७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन या आठवड्यात अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानक परिसरात नाव फलक लावण्यात आला आहे त्यावर “सावंतवाडी रोड” असा उल्लेख करण्यात आला आहे, जो काही अंशी चुकीचा आहे, कारण त्या ठिकाणी टर्मिनस चे उद्घाटन झालेले आहे आणि कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात येत असल्याचे निर्दशनास आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचा नावे करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जा ची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा,पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निवेदन दिली आहेत. तसेच आंदोलन छेडले, जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यासाठी यापुढेही आंदोलने छेडण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे न केल्यास ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्याचा ईशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे.
आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.
क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग




साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले
Follow us on




सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.
कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.





रत्नागिरी, दि. १२ जुलै:भाजपचे खासदार नारायण राणे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसु रिफायनरी आंदोलकांनी पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांना एका पत्राद्वारे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘’बारसू रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू दिले जाणार नाही आणि आले तर बाकीची जबाबदारी आमची, पोलिसांची नाही” , अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नारायण राणे यांची गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणार्या स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.
खळबळजनक: खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवितास धोका, पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी – Kokanai https://t.co/qhqKz7PJtu#मराठीबातम्या #कोकणातीलबातम्या #कोकण #narayanrane #barsurefinery pic.twitter.com/WDEphuLyHS
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) July 12, 2024