Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी आगारात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेपैकी पाच नवीन गाड्यांचे सावंतवाडी बसस्थानकामध्ये थाटात आगमन झाले. या नवीन बसफेऱ्यांच्या स्वागतानंतर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन आणि नारळ फोडून या बससेवेचे जनतेसाठी अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर आमदार केसरकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह याच नवीन बसमधून प्रसिद्ध मोती तलावापर्यंत एक आनंददायी सफर देखील केली.

​या विशेष प्रसंगी संवाद साधताना आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मोलाच्या सहकार्यातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण ३० नवीन गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण मंजुरीमधील सावंतवाडी विभागासाठी १०, तर वेंगुरला आणि दोडामार्ग या दोन्ही तालुक्यांसाठी प्रत्येकी ५ नवीन गाड्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

​सध्या पहिल्या टप्प्या अंतर्गत पाच बसेस दाखल झाल्या असून आगामी गणेशोत्सवाच्या सणात प्रवाशांना सर्वोत्तम आणि दर्जेदार एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सध्या सुरू असलेल्या सावंतवाडी बसस्थानकाच्या कामासंदर्भात बोलताना, गणेशोत्सवाच्या कालावधीत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय सहन करावी लागू नये, यासाठी बसस्थानका परिसरातील खडे भरण्याचे व दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

​या शानदार लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे अनेक प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, सभापती सुस्मिता जाधव, स्थानक प्रमुख गौतमी कुबडे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, अशोक दळवी यांच्यासह अजय गोंदावले, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगलकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, राजन रेडकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, राजू कुबल, हर्षद डेरे, सत्यवान बांदेकर, बबलू मिसाळ, क्लेटस फर्नांडिस, हेमंत बांदेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, गुंडू जाधव, विवेक म्हापसेकर, विशाल सावंत यांसह पक्षाचे इतर अनेक सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

सावंतवाडी मोती तलावात उडी मारून दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या; वाचवायला गेलेल्या तरुणाचाही बुडून दुर्दैवी मृत्यू

No block ID is set

सावंतवाडी शहरात शनिवारी सकाळी एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली. कारिवडे येथील शाळेत दहावी इयत्तेत शिकणारी लिसा गोसावी ही विद्यार्थिनी आपली सकाळची शाळा संपवून नातेवाईकांसोबत सावंतवाडीत आली होती. यावेळी तिचा नातेवाईक रोहन गोसावी, जो मुंबईहून तिला भेटण्यासाठी आला होता, तो देखील तिच्यासोबत होता. हे सर्वजण फिरत असताना मोती तलावाच्या परिसरात पोहोचले.

​सावंतवाडीतील मोती तलावाच्या काठी बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे लोक थांबले होते. या दरम्यान, तलावाच्या कठड्यावर तलावाच्या दिशेने तोंड करून बसलेल्या लिसाने अचानक पाण्यात उडी घेतली. हे दृश्य पाहून तिच्या सोबत असलेल्या चुलत बहिणीने तातडीने रोहन गोसावी याला या घटनेची कल्पना दिली. तिला वाचवण्याच्या आवेगाने रोहनने लागलीच तलावात उडी मारली.

​मात्र, या दुर्दैवी घटनेत लिसा आणि तिला वाचवण्यासाठी गेलेला रोहन या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ शोध घेतल्यानंतर युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला, तो बाहेर काढला असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर मुलीचा मृतदेह पाण्यात अडकल्याने तो शोधण्यात अडथळे निर्माण झाले होते.

​या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाचे सूत्र हाती घेत सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली-सांगेली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवून काही वेळातच मुलीचा मृतदेह शोधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

​विद्यार्थिनीने नक्की कोणत्या कारणास्तव हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि पोलीस हर्षद हिंगे हे प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सावंतवाडी शहरात शोककळा पसरली असून, तलाव काठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

आंबोली-चौकुळच्या विकासाला १०६ कोटींच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेची बळकटी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: आंबोली आणि चौकुळ या भागातील नैसर्गिक जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने, तिथे शाश्वत पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत १०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर दिल्लीत सकारात्मक चर्चा झाली असून, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास या परिसराच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, आंबोली, चौकुळ आणि गेळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर ‘वन नोंद’ आहे, त्या जमिनींचे वाटप आणि प्रत्यक्ष वहिवाट असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय, सार्वजनिक प्रवासासाठी लवकरच पाच नवीन एसटी बसेस सेवेत दाखल होतील आणि त्यांचे लोकार्पण लवकरात लवकर केले जाईल.

शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, या मार्गाला आमचा कोणताही विरोध नाही, उलट महामार्गाची अलाईनमेंट बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून मळगाव आणि चौकुळ परिसराला जोडता येईल. शासनाचा सांवतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण पाठिंबा असून, ताज हॉटेल समूहाशी झालेल्या सामंजस्य करारानुसार लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Shaktipeeth Expressway: पहिल्याच सुनावणीत महामार्गाला तीव्र विरोध; दाभिलवासीयांची आक्रमक भूमिका

   Follow us on        

सिंधुदुर्ग: पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) दरम्यान नियोजित असलेल्या महाराष्ट्र शक्तीपीठ दुतर्फा महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करण्यासाठी १९ जून रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या अधिसूचनेनंतर जमिनीच्या संपादन प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील १४ गावांमध्‍ये दाभिल गावात सर्वप्रथम सुनावणी पार पडली. या पहिल्याच बैठकीत दाभिलवासीयांनी या प्रकल्पाला प्रचंड विरोध दर्शवत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

​महसूल प्रशासनाने दाभिल गावात घेतलेल्या या सुनावणीसाठी गावकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८-अ चा उतारा, फेरफार पत्रक, जमिनीचा नकाशा तसेच इतर कायदेशीर कागदपत्रांसह उपस्थिती दर्शवली. महसूल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वीरसिंग वसावे, सावंतवाडीचे भूमी अभिलेख अधीक्षक ठाकरे, नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर, महसूल साहाय्यक अधिकारी पंकज मांजरेकर, मोनार्छ कंपनीचे सर्वेअर प्रतिनिधी साईराज, तलाठी विजय कवितकर, ग्रामसेवक प्रफुल्ल धुरी आणि क्षेत्रपाल अशोक गावडे आदी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

​दाभिलवासीयांच्या वतीने शशिकांत गवस, अनिल गवस, भिकाजी घाडी, विष्णू घाडी, शशिकांत घाडी आणि शंकर निकम यांनी प्रकल्पावर जोरदार आक्षेप घेतला. प्रस्तावित महामार्गाची रचना, विस्तार आणि मोजणी नेमकी कशा प्रकारे होणार, तसेच ती कोणत्या जागेवरून जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचा मुद्दा गावकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच या महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या मोनार्छ कंपनीच्या प्रतिनिधींनी लॅपटॉपवर केवळ रेष मारून दाखवली, पण प्रत्यक्ष मोजणी केली नसल्याची तक्रार त्यांनी केली.

​प्रस्तावात बोगदे, पूल आणि रस्ता किती पदरी आहे, तसेच देवस्थाने या मार्गात जात आहेत का, याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे परिपूर्ण माहिती आणि योग्य पुराव्यांसह बाजू मांडण्याची मागणी करत गावकऱ्यांनी लेखी हरकती नोंदवल्या. ही सुनावणी अतितादिशी न होता अतिघाईने प्रक्रिया पूर्ण करून हा महामार्ग आमच्या माथी मारू नये, असे सांगत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

​यावेळी दाभिल गावातील दाजी तुकाराम घाडी, कृष्णा न्हाणू घाडी, राजश्री लाडू राऊळ, सखाराम तुकाराम जाधव, बाबली महादेव राऊळ, विष्णू महादेव राऊळ, रमेश राऊळ, विद्याधर घाडी, भगवान राणे, अनिकेत जाधव, शिवप्रसाद देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गवस व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाभिलमधील या पहिल्याच सुनावणीत विरोध झाल्यामुळे या मार्गांतर्गत येणाऱ्या इतर गावांमध्येही या प्रकल्पाला विरोध होण्याचे संकेत यातून मिळाले आहेत.

सावंतवाडी शहराला इको-सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याचा ठराव मंजूर

सांवतवाडी नगरपरिषदेच्या विशेष सभेत तीन महत्त्वाचे ठराव मंजूर

   Follow us on        

सांवतवाडी: नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्षा श्रद्धा जे. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा होऊन ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या सभेला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह विविध समितींचे सभापती व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​सभेमध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह क्षेत्राबाबत जाहीर केलेल्या मसुदा अधिसूचनेचा विचार करण्यात आला. या अधिसूचनेचा सांवतवाडी शहर व परिसरातील बांधकामावर तसेच हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ही बाब लक्षात घेता, शहराला इको-सेन्सिटिव्ह झोनमधून पूर्णपणे वगळण्यात यावे, असा ठराव सभागृहात मांडण्यात आला व तो मंजूर झाला.

​या विषयावर चर्चा करताना नगरसेवक ॲड. निता कवितकर-सावंत, आनंद नेवगी, अजय गोंदावळे आणि सिद्धार्थ भांबुरे यांनी आपली मते व्यक्त केली. शहरावर होणारे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. नगराध्यक्षांनी यावर स्पष्ट केले की, या संदर्भात शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येईल, जेणेकरून प्रत्येक प्रभागातील नागरिक आपापल्या हरकती अधिकृतपणे नोंदवू शकतील.

​तसेच, सांवतवाडीत केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्यामार्फत आयुर्वेद बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्याबाबतच्या सामंजस्य कराराला देखील या सभेत मंजुरी देण्यात आली. या ओपीडीसाठी लागणारी जागा व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे, या ओपीडीमध्ये नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाऊ नये आणि त्यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, असा महत्त्वपूर्ण अट या करारात घालण्यात आली आहे.

​या व्यतिरिक्त सांवतवाडीची ओळख असलेल्या पारंपारिक लाकडी खेळणी, लाककाम आणि गंजिफा कला प्रकारांना युनेस्कोकडून जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी विशेष प्रस्ताव तयार करून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या शेवटी, शहरवासीयांना मोफत ओपीडी सुविधा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नांचे इतर नगरसेवकांनी कौतुक केले. या बैठकीला अनेक माजी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

खुशखबर! सर्व अडथळे दूर; सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मार्ग मोकळा

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडीत गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आता मार्गी लागला आहे. राजघराण्याच्या वतीने हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी रीतसर संमती देण्यात आली आहे, ज्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींची माहिती सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली. या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी राजघराण्यासह कोल्हापूर न्यायालयाचे मुख्य अधिवक्ता आणि संबंधित वकिलांचे आभार मानले आहेत.

​आमदार केसरकर यांनी सांगितले की, जागेअभावी हे हॉस्पिटल उभारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. परिणामी, दरवर्षी सुमारे दहा हजार रुग्णांना उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे धाव घ्यावी लागत असे आणि दुर्दैवाने काही रुग्णांचा प्रवासातच जीव जात असे. मात्र, आता हा कळीचा अडसर दूर झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

​न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आमदार केसरकर यांनी ‘झूम’ ॲपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत संबंधित राजघराण्यातील व्यक्तींना ५० गुंठे जागा हस्तांतरित केली जाणार आहे, तर उर्वरित जागेवर भव्य अशा सात मजली इमारतीचे निर्माण केले जाईल. प्रशासकीय पातळीवर या प्रकल्पासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​या हॉस्पिटलच्या आर्थिक तरतुदीबद्दल बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीला या प्रकल्पासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, जागेचा प्रश्न लांबल्यामुळे आता एकूण खर्च ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढीव खर्च झाला असला तरीही, सर्वसामान्यांच्या आरोग्याची गरज लक्षात घेता या कामाला गती देण्यात येणार असून, आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.

​प्रस्तावित सात मजली इमारतीमध्ये सर्वसामान्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये कॅन्सर उपचारांसह, ब्रेन सर्जरी, हार्ट सर्जरी आणि यूरोलॉजी अशा चार प्रमुख विभागांचा समावेश असणार आहे. या सुविधांमुळे सावंतवाडी आणि परिसरातील गरजू रुग्णांना आता उपचारासाठी लांबचा प्रवास करण्याची गरज उरणार नाही, असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणार ४,००० कोटींचा सोलर पॅनेल प्रकल्प

   Follow us on        

सिंधुदुर्ग: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची घोषणा करत एक प्रकारे विकासाचा धडाका लावला आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडळी एमआयडीसीमध्ये तब्बल ४,००० कोटी रुपयांचा भव्य सोलर पॅनेल प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे २,००० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

​केवळ सोलर प्रकल्पच नाही, तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीनेही मोठी बातमी सामंत यांनी दिली. ‘ताज’ समूहाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे आता आडळी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. यामुळे या भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असून स्थानिक नागरिकांना दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

​आडळी एमआयडीसीमधील तब्बल ४७ उद्योगांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावत, एमआयडीसीचा विस्तार करण्याची ग्वाही देखील उद्योगमंत्र्यांनी दिली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नेतृत्वाचे आशीर्वाद आणि जनतेचा भक्कम पाठिंबा असेल, तर कोणतीही राजकीय उद्दिष्टे साध्य करणे शक्य असते. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपले सरकार काम करत असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

​या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. उद्योगांच्या विस्ताराबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, ४७ उद्योगांच्या जागेचा प्रश्न सुटल्यामुळे आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल. या विस्ताराच्या निर्णयामुळे भविष्यात आणखी १,२०० ते १,५०० लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

​याप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनीही आपल्या मनोगतातून विकासकामांवरील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, आमदार म्हणून जिल्ह्याचा विकास करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. एकूणच, या घोषणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी एक नवी आशा निर्माण झाली आहे.

‘ताज’ हॉटेल प्रकल्पमुळे पर्यटन विकासाला मिळणार चालना विष्णु मोंडकर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमध्ये जागतिक दर्जाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाचा विकास होऊन रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

​सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यात जागतिक दर्जाचे ‘ताज’ हॉटेल उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या पुढाकारातून आणि मंत्र्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाच्या नवीन शक्यता निर्माण होणार आहेत.

​इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) समूहामार्फत साकार होणाऱ्या या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार नाही, तर पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

​माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन स्थानिक जमीनधारकांना सोबत घेत एक त्रिपक्षिय करार केला. या कराराच्या अंमलबजावणीमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, स्थानिक जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

​हा प्रकल्प पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ धोरणानुसार एक मैलाचा दगड मानला जात आहे. रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांकडे गेलेल्या कोकणातील तरुण-तरुणींना आता आपल्याच मायभूमीत, आपल्याच जिल्ह्यात रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे तरुण पुन्हा आपल्या गावी परतण्यास प्रोत्साहित होतील, ही मोठी जमेची बाजू आहे.

​पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. ‘ताज’सारख्या नामांकित जागतिक ब्रँडच्या आगमनामुळे येथील स्थानिक हॉटेल व्यावसायिक, वाहतूक सेवा आणि इतर सेवा क्षेत्राला थेट लाभ होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आंबोलीत नांगरतास येथे ट्रक आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक

   Follow us on        

आंबोली: नांगरतास येथील मायकल डिसोझा यांच्या फार्म हाऊसजवळ आज सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात घडला. एका ट्रकने विरुद्ध दिशेने प्रवास करताना समोरून येणाऱ्या वॅगनार कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा अपघात झाला.

​या दुर्दैवी घटनेत वॅगनार कारमध्ये प्रवास करणाऱ्या माणगाव कट्टावाडी (ता. कुडाळ) येथील केशव दत्ताराम केसरकर (वय २७) आणि संतोष रामचंद्र धुरी (वय ३२) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यामध्ये संतोष धुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

​अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.

​बचावकार्यात स्थानिक नागरिकांची मोठी मदत झाली. मायकल डिसोझा, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, दीपक मिस्त्री आणि विशाल सुतार या स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले.

​जखमींना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sindhudurg: मतदार याद्यांची शुद्धी! ८२ हजारांहून अधिक अवैध मतदार वगळले; ११.५० टक्क्यांची घट.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे एकूण ८२ हजार ५८० मतदारांची नावे कमी झाली असून, जिल्ह्यातील मतदारसंख्येत ११.५० टक्क्यांची घट झाली आहे.

   Follow us on        

​सिंधुदुर्ग: जिल्ह्यात नुकत्याच पूर्ण झालेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अर्थात ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या एकूण मतदारसंख्येत मोठी घट झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या प्रक्रियेमध्ये तब्बल ८२ हजार ५८० मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. या मोठ्या बदलामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येत ११.५० टक्क्यांची घट झाली असून, याचा परिणाम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

​निवडणूक आयोगाच्या या ‘एसआयआर’ प्रक्रियेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करणे हा असतो. यामध्ये प्रामुख्याने एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी झालेली दुबार नोंदणी शोधणे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार किंवा मृत व्यक्तींची नावे यादीतून काढून टाकणे, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या नोंदींची सखोल तपासणी करून त्या वगळणे, अशा बाबींचा समावेश होतो. या प्रक्रियेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंख्येत झालेली लक्षणीय घट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

​जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास, सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक ३० हजार ६४७ नावे कमी झाली आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ३४ हजार ५१९ मतदार असताना, आता झालेली ही घट १२.८५ टक्के इतकी मोठी आहे. यावरून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडल्याचे स्पष्ट होते.

​त्यापाठोपाठ कुडाळ विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे. कुडाळमध्ये २ लाख १९ हजार २४४ मतदारांपैकी २७ हजार ४५६ मतदारांची नावे कमी करण्यात आली असून, येथील घट १२.५२ टक्के इतकी आहे. अशा प्रकारे कुडाळमध्येही एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार यादीत आमूलाग्र बदल झाल्याचे दिसून येत आहे.

​कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता, येथे २ लाख ३४ हजार २५१ मतदारांपैकी २४ हजार ९८५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. येथील घट १०.६७ टक्के असली, तरी २५ हजारांच्या आसपास नावे कमी होणे हीदेखील मोठी संख्या मानली जात आहे. आता या मोठ्या घटीचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मतदारनिहाय कारणांची सविस्तर आकडेवारी समोर येणे महत्त्वाचे ठरणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदललेल्या अंतिम मतदार यादीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search