Category Archives: सिंधुदुर्ग

दुर्दैवी घटना: वेंगुर्ले येथे मासेमारी करताना तरुण समुद्रात बुडाला

   Follow us on        

वेंगुर्ले:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निमुसगा भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अणसूर देऊळवाडा येथील रहिवासी असलेला सचिन सिताराम गावडे (वय ३१) हा तरुण आपल्या मित्रांसोबत समुद्रात गळ टाकून मासेमारी करण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास लाईटहाऊसच्या मागील बाजूस असलेल्या खडकावर बसून तो मासेमारी करत होता. त्याच वेळी समुद्रात उठलेल्या एका प्रचंड मोठ्या लाटेने त्याला ओढले. लाटेच्या तीव्र प्रवाहामुळे त्याचा तोल सुटला आणि तो थेट समुद्राच्या पाण्यात फेकला गेला. काही क्षणातच तो खोल पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला.

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने समुद्रात त्याचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही सचिनचा कुठेही पत्ता लागलेला नाही. या अपघाताबाबत सचिनसोबत मासेमारीसाठी गेलेला त्याचा मित्र, अणसूर सुतारवाडी येथील रहिवासी शंकर रवींद्र मेस्त्री (वय ४०), याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात रीतसर माहिती दिली असून त्यानुसार सध्या पोलिसांत ‘नापत्ता’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

​या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारे गळ टाकून मासेमारी करताना एक युवक बुडाल्याची घटना घडली होती. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी दुर्घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बाजारपेठांत नैसर्गिक अळंब्यांचे आगमन; किंमत ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ!

सिंधुदुर्ग/गोवा :

पावसाने काहीशी विश्रांती घेताच तळकोकणात आणि गोव्यात जंगलातील वारुळांवर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या चवदार ‘अळंब्यांची’ (रानमशरूम) वेध लागतात. या हंगामातील अळंब्यांचे गोव्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बाजारपेठेत जोरदार आगमन झाले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात या अळंब्यांचे दर गगनाला भिडले असून, अवघ्या १०० अळंब्यांसाठी ग्राहकांना तब्बल १५०० रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातून विक्रीसाठी आणलेली ही अळंबी महाग असली, तरी त्यांच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

​साधारणपणे पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे वारुळांवर ही अळंबी नैसर्गिकरित्या उगवतात. ठराविक आकाराची झाली की स्थानिक लोक ती शोधून बाजारात विक्रीसाठी आणतात. साखळी आणि डिचोली भागात प्रामुख्याने ही अळंबी मोठ्या प्रमाणात मिळतात. पूर्वी ही अळंबी नगाप्रमाणे किंवा विशिष्ट संख्येने विकली जायची, परंतु आता बाजारात त्यांची विक्री ‘वाट्यांच्या’ (हिश्श्यांच्या) स्वरूपात केली जात आहे. एका वाट्यात नेमकी किती अळंबी आहेत याचा अंदाज येत नसला, तरी विक्रेते त्याचे ठरलेले पैसे मात्र एक रुपयाही कमी न करता वसूल करत आहेत.

निसर्गाकडून मिळणाऱ्या या रानमेव्याची चव प्रत्येक गोमंतकीयाला हवीहवीशी वाटते. अत्यंत चवदार असल्यामुळे अळंबी सर्वांचीच आवडती असतात, म्हणूनच महाग असूनही लोक वर्षातून एकदा तरी ती आवर्जून खरेदी करतात. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे आणि कडक ऊन पडल्यामुळे अळंब्यांचे पीक चांगले आले असले, तरी वाढत्या महागाईमुळे ते सामान्य लोकांच्या बजेटबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत बाजारात अळंब्यांची आवक वाढेल आणि त्यानंतर त्यांचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

सावंतवाडीत धर्मप्रचार करण्याचा प्रयत्न; गोव्यातील मिशनरी जेरबंद

   Follow us on        

सावंतवाडी:

येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या धर्माचा प्रचार आणि शिकवण देणाऱ्या काही मिशनरींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार सुरू होता. हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, प्राथमिक तपासात हे मिशनरी गोवा राज्यातील असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट उद्देशाने (मिशन) आपण हा प्रचार करत होतो, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.

​बजरंग दलाची सतर्कता अन् कारवाई

उद्यानात कॉलेजच्या सुट्टीदरम्यान हा प्रकार घडत असताना, एका जागृत विद्यार्थ्याने या प्रकरणाची माहिती फोनवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिली. तसेच या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. स्वतःचे चित्रीकरण होत असल्याचे पाहून मिशनरींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून जाब विचारला असता, आपण विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत असल्याचे त्यांनी कबूल केले.

​नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलीस ठाण्यात त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाविद्यालयीन तरुण आणि नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषांना किंवा धार्मिक प्रचाराला बळी पडू नये, तसेच असा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासन किंवा हिंदू संघटनांशी संपर्क साधावा, असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

शक्तीपीठ महामार्ग संबंधित शंका निरसन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे ‘सह्याद्री’ वाहिनीवर प्रसारण

   Follow us on        

वर्धा / सिंधुदुर्ग:

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वर्धा येथे अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमात महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. मिश्रा सर, वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले. या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, १५ जुलै २०२६ आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता ‘दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीवर करण्यात येत आहे. महामार्गाबाबतची अधिकृत माहिती आणि शासकीय भूमिका समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​हा महामार्ग ज्या गावांतून जात आहे, त्या सर्व गावांमधील संबंधित शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, फुकेरी, झोळंबे तसेच सावंतवाडी तालुक्यातील केगद, उडेली, नेने, फणसवडे, डेगवे, बांदा, घारपी, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव आणि पडवे या गावांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित गावांमधील स्थानिक सुजाण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना हा संवाद कार्यक्रम पाहण्याची विनंती करावी, जेणेकरून थेट प्रशासनाकडून मिळणारी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.

‘मुंबई वॉटर मेट्रो’ साठी लागणार्‍या बोटी सिंधुदुर्ग जिल्हय़ात बनणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ‘गुड न्यूज’ दिली आहे. मंत्रालयामध्ये ‘जोया मरीन कंपनी’ आणि ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड बंदर मंत्रालय’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित करण्यात आला आहे. या करारानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘मुंबई वॉटर मेट्रो’साठी लागणाऱ्या ५० आणि १०० पॅसेंजरच्या बोटी या प्रकल्पांतर्गत बनवल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अशा जवळपास १०० बोटी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​हा भव्य बोट निर्मितीचा कारखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तळवणे गावात उभा राहणार आहे. बोट क्राफ्ट, येल्लो फ्लीट यांसारख्या कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प जिल्ह्यात आणला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. नोकरी-धंद्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी गेलेल्या कोकणातील तरुणांना पुन्हा आपल्या मातृभूमीत परत आणणे (रिव्हर्स मायग्रेशन), हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

​या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे स्थानिक अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. या कारखान्यात विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असल्याने, पालकमंत्र्यांनी स्थानिक तरुण-तरुणींना या क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये (Skills) आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, येत्या ५ वर्षांत जहाज बांधणी, मत्स व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रात असे अनेक मोठे प्रकल्प सिंधुदुर्गात आणून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

Landslide in Amboli Ghat: आंबोली घाटात मोठे दगड रस्त्यावर; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी: आंबोली घाटातील मुख्य रस्त्यावर चार नंबर धबधब्याजवळ मंगळवारी (७ जुलै) रात्री दोन ते तीन मोठे दगड थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती, मात्र सुदैवाने दगड कोसळले त्यावेळेस तिथे कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे.

घाटात पूर्वी ज्या ठिकाणी दरड कोसळली होती, त्या जागेपासून काही अंतरावरच ही घटना घडली. सध्या हे मोठे दगड रस्त्यावरच असल्यामुळे तिथून केवळ दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांची एकेरी (वन-वे) वाहतूक सुरू आहे.

पालकमंत्र्यांकडून तातडीने दखल:

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील दगड तातडीने बाजूला करण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.

यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते आणि पथक घटनास्थळी रवाना झाले असून, दगड हटवण्यासाठी जेसीबी पाचारण करण्यात आला आहे. लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

एलसीबीची मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई; दीड कोटींच्या गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शनिवारी पहाटे सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे एक मोठी धडक कारवाई केली. गोव्याहून मुंबईकडे अवैध रित्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका ‘टाटा सिग्मा’ दहा चाकी ट्रकवर पोलिसांनी छापा टाकला. या ट्रकमधून तब्बल १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दारूसह ३५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी ट्रकचालक विरेंद्र गोविंद पटेल (वय ४९, रा. लोलावत का मोहल्ला, धर्कदा, उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार, विल्सन डिसोझा तसेच पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वर समजिसकर आणि ऋषिकेश टोपले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अपघाताला आमंत्रण! आंबोली घाटात दरड कोसळून तीन दिवस उलटले तरी ढिगारा तसाच

   Follow us on        

आंबोली: निसर्गसौंदर्याने नटलेल्या आंबोली घाटातील सनसेट पॉईंट परिसरामध्ये तीन दिवसांपूर्वी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. डोंगरकड्यावरून अचानक एक अजस्र कडा आणि सोबतीला मातीचा ढिगारा थेट मुख्य रस्त्यावर येऊन कोसळला. हा दगड अगदी रस्त्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या शेजारी पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. परंतु, या  घटनेला तीन दिवस उलटून गेले, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला ही दरड हटवण्यास वेळ मिळालेला नाही. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सध्या हा भलामोठा दगड रस्त्याच्या कडेलाच असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाचा जोर आणि धुक्याचं साम्राज्य यामुळे रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशा वेळी एखादे वाहन या ढिगाऱ्यावर आदळून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आंबोली घाटात दरडी कोसळण्याच्या घटना नव्या नाहीत, पण अशा संवेदनशील आणि धोकादायक ब्लॅक स्पॉटची वेळेत दखल न घेण्याच्या प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

​सध्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दररोज आंबोलीत हजेरी लावत आहेत. जर मुख्य रस्त्यावरील हा अडथळा तातडीने दूर केला नाही, तर पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडू शकते आणि आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे संबंधित विभागाने आता तरी सुस्तपणा झटकून हा रस्ता तातडीने मोकळा करावा आणि संपूर्ण घाटाची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

​’लालपरी’ झाली जलपरी! चालत्या बसमध्ये छत्री उघडून बसण्याची प्रवाशांवर नामुष्की!

   Follow us on        

सावंतवाडी:

“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) कारभार चौकुळ-कुंभवडे मार्गावर मात्र प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर धावणारी एकमेव एसटी बस पूर्णपणे गळकी झाली असून, प्रत्येक पावसाळ्यात प्रवाशांना चक्क बसमध्ये बसूनही छत्र्या उघडाव्या लागत आहेत. या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या उल्हास पनवेलकर, स्वरांगी गावडे, समिक्षा गावडे, कमलेशकुमार गावडे, सुनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रकाश जाधव, राहुल चव्हाण, ऋतुराज गावडे, सुरेश गावडे आदी नागरिकांनी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे लेखी निवेदन देऊन ही बस तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

​या मार्गावरील एसटीवर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, बसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांचे कपडे, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि नोकरदारांची महत्त्वाची कागदपत्रे भिजून नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित बनला आहे. प्रवाशांनी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

​”महामंडळाकडे नवीन बसेस उपलब्ध आहेत, मग चौकुळ-कुंभवडे मार्गावरील प्रवाशांच्या नशिबीच ही गळकी बस का? ग्रामीण भागातील नागरिक एसटी प्रशासनासाठी दुय्यम आहेत का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. महामंडळाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात सुरक्षित, स्वच्छ आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अन्यथा “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य केवळ फलकापुरतेच उरेल, अशी टीकाही केली जात आहे. प्रशासन आता तरी खडबडून जागे होऊन चौकुळ-कुंभवडे मार्गावरील गळकी एसटी तातडीने बदलणार की प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search