वेंगुर्ले:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील निमुसगा भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अणसूर देऊळवाडा येथील रहिवासी असलेला सचिन सिताराम गावडे (वय ३१) हा तरुण आपल्या मित्रांसोबत समुद्रात गळ टाकून मासेमारी करण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास लाईटहाऊसच्या मागील बाजूस असलेल्या खडकावर बसून तो मासेमारी करत होता. त्याच वेळी समुद्रात उठलेल्या एका प्रचंड मोठ्या लाटेने त्याला ओढले. लाटेच्या तीव्र प्रवाहामुळे त्याचा तोल सुटला आणि तो थेट समुद्राच्या पाण्यात फेकला गेला. काही क्षणातच तो खोल पाण्यात बुडाला आणि दिसेनासा झाला.
या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या मदतीने समुद्रात त्याचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही सचिनचा कुठेही पत्ता लागलेला नाही. या अपघाताबाबत सचिनसोबत मासेमारीसाठी गेलेला त्याचा मित्र, अणसूर सुतारवाडी येथील रहिवासी शंकर रवींद्र मेस्त्री (वय ४०), याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात रीतसर माहिती दिली असून त्यानुसार सध्या पोलिसांत ‘नापत्ता’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच मोचेमाड समुद्रकिनाऱ्यावर अशाच प्रकारे गळ टाकून मासेमारी करताना एक युवक बुडाल्याची घटना घडली होती. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी दुर्घटना असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करताना नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


