बाजारपेठांत नैसर्गिक अळंब्यांचे आगमन; किंमत ऐकून डोळे पांढरे होण्याची वेळ!

सिंधुदुर्ग/गोवा :

पावसाने काहीशी विश्रांती घेताच तळकोकणात आणि गोव्यात जंगलातील वारुळांवर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या चवदार ‘अळंब्यांची’ (रानमशरूम) वेध लागतात. या हंगामातील अळंब्यांचे गोव्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ातील बाजारपेठेत जोरदार आगमन झाले आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात या अळंब्यांचे दर गगनाला भिडले असून, अवघ्या १०० अळंब्यांसाठी ग्राहकांना तब्बल १५०० रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातून विक्रीसाठी आणलेली ही अळंबी महाग असली, तरी त्यांच्या खरेदीसाठी खवय्यांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

​साधारणपणे पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे वारुळांवर ही अळंबी नैसर्गिकरित्या उगवतात. ठराविक आकाराची झाली की स्थानिक लोक ती शोधून बाजारात विक्रीसाठी आणतात. साखळी आणि डिचोली भागात प्रामुख्याने ही अळंबी मोठ्या प्रमाणात मिळतात. पूर्वी ही अळंबी नगाप्रमाणे किंवा विशिष्ट संख्येने विकली जायची, परंतु आता बाजारात त्यांची विक्री ‘वाट्यांच्या’ (हिश्श्यांच्या) स्वरूपात केली जात आहे. एका वाट्यात नेमकी किती अळंबी आहेत याचा अंदाज येत नसला, तरी विक्रेते त्याचे ठरलेले पैसे मात्र एक रुपयाही कमी न करता वसूल करत आहेत.

निसर्गाकडून मिळणाऱ्या या रानमेव्याची चव प्रत्येक गोमंतकीयाला हवीहवीशी वाटते. अत्यंत चवदार असल्यामुळे अळंबी सर्वांचीच आवडती असतात, म्हणूनच महाग असूनही लोक वर्षातून एकदा तरी ती आवर्जून खरेदी करतात. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे आणि कडक ऊन पडल्यामुळे अळंब्यांचे पीक चांगले आले असले, तरी वाढत्या महागाईमुळे ते सामान्य लोकांच्या बजेटबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत बाजारात अळंब्यांची आवक वाढेल आणि त्यानंतर त्यांचे दर कमी होतील, अशी आशा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search