मुंबई: राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये किनाऱ्याशी सातत्याने संपर्क साधता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खोल समुद्रात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने मच्छिमारांना हवामान बदलाची माहिती मिळणे किंवा आपत्कालीन मदत मिळवणे कठीण होते. या समस्येचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांच्यात सविस्तर चर्चा झाली असून, मच्छिमारांना ‘बीएसएनएल ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस’ (GSPS) उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
या संदर्भात माहिती देताना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील मच्छिमारांचे प्राण आणि त्यांची उपजीविका सुरक्षित ठेवणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सॅटेलाईट फोनच्या सुविधेमुळे दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे खराब हवामान, यांत्रिक बिघाड किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात तात्काळ बचावकार्य राबवणे शक्य होणार आहे.
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, उपकरणांची वैशिष्ट्ये आणि कव्हरेजचे सादरीकरण केले. राज्य शासनाच्या ‘मच्छिमार सुरक्षा प्रथम’ या धोरणांतर्गत ही अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था कार्यान्वित झाल्यास राज्यातील खोल समुद्रात काम करणाऱ्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार असून, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मत्स्यव्यवसाय अधिक आधुनिक व सुरक्षित होण्यास मदत होईल.


