मुंबई:
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पाण्डेय यांच्यात रेल्वेच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, जोगेश्वरी जंक्शनच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून महाराष्ट्रासह इतर राज्यांत जाणाऱ्या गाड्यांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणाऱ्या जोगेश्वरी जंक्शनचे काम सध्या वेगाने सुरू असून, जानेवारी २०२७ पासून येथून बाहेरगावासाठी रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असे आश्वासन महाव्यवस्थापक रामाश्रय पाण्डेय यांनी दिले. या जंक्शनचा विकास ‘आधुनिक मल्टीमोडल ट्रान्झिट हब’ म्हणून केला जात असून, रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक साधनांची जोडणी केली जाईल. पहिल्या टप्प्यात कार आणि दुचाकी पार्किंगची सोय असेल, तर आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या शक्य झाल्यास दुसऱ्या टप्प्यात येथे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून हॉटेल आणि मॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याच बैठकीत उपनगरीय रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवणाऱ्या गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. ७.०८ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी ८९८.२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, हे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा संकल्प आहे. या विस्तारीकरणादरम्यान गोरेगाव स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, बांद्रा ते अंधेरी दरम्यानच्या धीम्या मार्गावरील स्थानकांच्या लांबीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, जानेवारी २०२७ पासून या मार्गावरून १५ डब्यांच्या गाड्या धावू शकतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. अंधेरी स्थानकावर ऑक्टोबर २०२६ पर्यंत १ नवीन लिफ्ट सुरू होईल, तर जून २०२७ पर्यंत आणखी २ सरकते जिने (एस्केलेटर) बसवले जातील. जोगेश्वरी स्थानकावरही जून २०२७ पर्यंत १ अतिरिक्त सरकता जिना कार्यान्वित केला जाईल, ज्याला मार्च २०२६ मध्ये मंजुरी मिळाली आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सुभाष नगर फूट ओव्हर ब्रिजवरील एस्केलेटरचे कामही जून २०२७ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
रेल्वे स्थानकांवरील इतर सोयी-सुविधांबाबत चर्चा करताना, स्थानकांवर स्वच्छता, वेटिंग रूम आणि स्तनपान कक्ष बांधण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या खासदार निधीतून मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. सद्यस्थितीत देशासाठी १३९ ही एकमेव हेल्पलाइन कार्यरत असून, त्याद्वारे तक्रारींचे निवारण केले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. सुरक्षेच्या दृष्टीने, आरपीएफ जवानांच्या ४८५ जागा रिक्त असल्या तरी उपलब्ध जवानांच्या माध्यमातून प्रवाशांना व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा पुरवली जात आहे. आरोग्य सुविधेचा भाग म्हणून अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांवर राज्य शासनाची रुग्णवाहिका तैनात असून, जोगेश्वरी स्थानकावरही अशी सेवा सुरू करण्याचा विचार आहे. दरम्यान, खासदार वायकर यांनी अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी वेळ दिल्यास तात्काळ ही पाहणी केली जाईल, असे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले आहे. या बैठकीला डीजीएम (जी) उज्ज्वल देव, सचिव सचिन शर्मा, उपनेते दिलीप शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.


